Pahalgam Terror Attack: पहलगाम हदशतवादी हल्ल्याप्रकरणी (Pahalgam Terror Attack) एनआयएच्या तपासाला वेग आला आहे. एनआयकडून खोऱ्याचं 3D मॅपिंग करण्यात आलं असून मोबाइल डंप डेटा देखील ताब्यात घेतला आहे. तसेच 2 हजार 800 हून अधिक लोकांची चौकशी देखील करण्यात आली आहे. यासोबत एक महत्वाची माहिती देखील समोर आली आहे.
पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला होऊ शकतो अशी माहिती गुप्तचर विभागाकडून मिळाली होती, एप्रिल महिन्याच्या सुरूवातीलाच तसा अलर्ट देण्यात आला होता अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय. एवढच नव्हे तर पहलगाममधील एका मोठ्या हॉटेलवर दहशतवादी हल्ला करणार होते. दहशतवाद्यांनी पहलगामबरोबरच आरू, बेताब या ठिकाणी रेकी देखील केली. धक्कादायक म्हणजे मार्च महिन्याच्या अखेरीस दहशतवादी गुलमर्गमध्ये पोहोचले होते. मात्र तिकडे कडक सुरक्षा असल्याने ते दक्षिण काश्मीरकच्या दिशेनं वळले, अशी माहिती समोर आली आहे.
दहशतवाद्यांविरुद्ध यूएपीए आणि बीएनएसनुसार गुन्हे दाखल-
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम हल्ल्याशी संबंधित एफआयआर एबीपी 'माझा'च्या हाती लागला आहे. या एफआयआरमध्ये हल्ल्याचा तपशीलवार घटनाक्रम नमूद करण्यात आला आहे. 22 एप्रिलला दुपारी 1 वाजून 10 मिनिटांनी सुरु झालेला हल्ला 2 वाजून 20 मिनिटांपर्यंत सुरु होता. हल्ल्यानंतर 10 मिनिटांत म्हणजे दुपारी अडीच वाजता एफआयआर दाखल झाला. दहशतवाद्यांना पाकस्थित सूत्रधारांकडून सूचना मिळत होत्या, असंही एफआयआरमध्ये म्हटलंय. हल्ल्यासाठी बेकायदेशीरपणे मिळवलेले ऑटोमॅटिक हत्यारे वापरण्यात आली. दहशतवाद्यांविरुद्ध यूएपीए आणि बीएनएसनुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
भारतावर आता सायबर युद्ध थोपवण्याचा प्रयत्न सुरू-
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर, भारतावर आता सायबर युद्ध थोपवण्याचा प्रयत्न सुरू झालाय. महाराष्ट्र सायबर सेलने सादर केलेल्या 'इकोज ऑफ पहलगाम' या अहवालात, 23 एप्रिलपासून देशभरात सुमारे 10 लाख सायबर हल्ले झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. भारतावर हे सायबर हल्ले पाकिस्तान, मध्य पूर्व, मोरोक्को आणि इंडोनेशियामधून केले जात असल्याचं अहवालात म्हटलंय. स्वतःला इस्लामिक गट म्हणवून घेणाऱ्या सायबर हल्ल्यांमध्ये, टीम इन्सेन पीके, एपीटी गट आघाडीवर आहेत. या हल्ल्यांमध्ये वेबसाइट डिफेसमेंट, सीएमएस एक्स्प्लॉयटेशन आणि कमांड अँड कंट्रोल हल्ल्यांचा समावेश आहे. याशिवाय, बांगलादेशी मिस्ट्रियस टीम आणि इंडोनेशियन गट इंडो हॅक्स सेक देखील सक्रिय आहेत, ज्यांनी भारतीय टेलिकॉम डेटा आणि स्थानिक ऍडमिन पॅनेलना टार्गेट केलंय. महाराष्ट्र सायबरने काही हल्ले रोखले आहेत, परंतु अहवालात भारतीय रेल्वे, बँकिंग आणि सरकारी पोर्टलसारख्या महत्त्वाच्या पायाभूत सुविधांना धोका असल्याचा इशारा देण्यात आला आहे.