उस्मानाबाद : दैवी चमत्कारामुळे राज्यभर प्रसिद्ध असणारे कळंब तालुक्यातील मलकापूर (Kalamb Malkapur) येथील एकनाथ सुभाष लोमटे महाराज (Eknath Lomte Maharaj) यांना 45 दिवसानंतर अटक करण्यात आली आहे. महाराजांच्या दर्शनासाठी मठात आलेल्या महिलेचा विनयभंग झाल्याप्रकरणी कळंब तालुक्यातील मलकापूर येथील एकनाथ लोमटे महाराजाविरोधात गुन्हा दाखल झाला होता. आशीर्वाद देण्याच्या बहाण्याने लोमटे महाराजांनी महिला भक्ताचा विनयभंग केला होता.
दैवी चमत्कारामुळे राज्यभर प्रसिद्ध असणारे कळंब तालुक्यातील मलकापूर येथील एकनाथ लोमटे महाराजाविरोधात 28 जुलै 2022 रोजी पीडित भक्त महिलेनं तक्रार दाखल केली होती. त्यानंतर लोमटे महाराजांविरोधात येरमाळा पोलिसात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल होताच लोमटे महाराज फरार झाला होते. अखेर 45 दिवसानंतर कळंब पोलिसांनी लोमटे महाराजाला आज सकाळी अटक केली आहे. कळंब तालुक्यातील मलकापूर येथे लोमटे महाराज यांचा मठ आहे. आपल्या दैवी शक्तीने महाराज आजारी व्यक्ती आणि भक्ताला बरे करतात अशी महाराजांची ख्याती आहे.
महाराजांचा राज्यभर मोठा भक्तवर्ग असून या मध्ये विविध पक्षांचे बडे नेते ही महाराज यांचे भक्त आहेत. भक्त महिलेच्या विनयभंग प्रकरणात लोमटे महाराज याला अटक झाल्याने धार्मिक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. लोमटे महाराजांनी किती महिला भक्तांची फसवणूक केली हे तपासात उघड होईल, असं पोलिसांनी सांगितलं. लोमटे महाराजांवर या पूर्वीही जादूटोणा आणि लोकांना फसवल्याचे गुन्हे दाखल आहेत.
काय आहे प्रकरण?
लोमटे महाराजांविरोधात यापूर्वी भोंदूगिरी करण्यासारखे गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत. महाराजांनी महिला दर्शनासाठी आली असता तिचा विनयभंग केला. इतकच नाही तर मी तुला गुंगीचं औषधं देऊन तुझ्यावर बलात्कार केला आणि त्याचा व्हिडीओ देखील शूट केल्याची धमकी देखील लोमटे महाराजांनी पीडित महिलेला दिल्याची माहिती समोर आली. या पीडितेच्या तक्रारीवरून लोमटे महाराजांवर गुन्हा दाखल झाला. गुन्हा दाखल होताच लोमटे महाराज फरार झाले.