नवी दिल्ली : देशातील कोणत्याही मोबाईलवर 15 जानेवारीपासून लँडलाईनवरुन फोन करताना मोबाईल नंबर आधी 0 लावणे अनिवार्य असणार आहे. दूरसंचार मंत्रालयाने सांगितलं की, फिक्स टू फिक्स्ड डायलिंग प्लॅन आणि मोबाईल टू मोबाईल कॉलमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. दूरसंचार विभागाने भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाच्या (ट्राय) प्रस्तावाला मान्यता दिली आहे. 29 मे 2020 रोजी ट्रायने अशा कॉलसाठी नंबर देण्यापूर्वी शून्य लावण्याची शिफारस केली होती. यामुळे टेलिकॉम सर्व्हिस प्रोव्हाडर कंपन्यांना अधिक नंबर तयार करण्याची सुविधा मिळणार आहे.


दूरसंचार विभागाने 20 नोव्हेंबर रोजी एका परिपत्रकाद्वारे सांगितले की, लँडलाईनवरून मोबाईलवर नंबर डायल करण्याचा मार्ग बदलण्यासाठी ट्रायच्या शिफारशी मान्य केल्या गेल्या आहेत. या परिपत्रकानुसार नियम लागू झाल्यानंतर लँडलाईनवरून मोबाईलवर कॉल करण्यासाठी नंबरच्या आधी शून्य डायल करा. दूरसंचार विभागाने सांगितले की मोबाईल नेटवर्क कंपन्यांना लँडलाईनच्या सर्व ग्राहकांना शून्य डायलिंग सुविधा द्यावी लागेल. ही सेवा सध्या आपल्या क्षेत्राबाहेरील कॉलसाठी उपलब्ध आहे. विभागाने निश्चित लाईन स्विचमध्ये योग्य ती घोषणा करण्यास सांगितले, जेणेकरुन फिक्स लाईन ग्राहकांना सर्व फोनवर कॉल करण्यासाठी 0 डायल करण्याची गरज आहे.


टेलिकॉम कंपन्यांना मदत मिळेल


नंबर डायल करण्याच्या या बदलांमुळे दूरसंचार कंपन्यांना मोबाइल सेवेसाठी 254.4 कोटी अतिरिक्त नंबर तयार करता येतील. यामुळे भविष्यातील गरजा भागवण्यात मदत होईल.