नागपूर : नागपूर महानगरपालिकेतर्फे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या निर्देशानुसार संपूर्ण नागपूर शहरामध्ये 'हर घर तिरंगा' अभियान 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीमध्ये उत्साहात राबविण्यात येणार आहे. या अभियानाद्वारे नागपूर शहरातील सुमारे 6 लाख घरांवर तिरंगा फडकाविण्याचे लक्ष्य आहे. याबद्दल नियोजन करण्यासाठी मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी मनपा मुख्यालयात अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत नागपूर शहरातील मनपा शाळा, खाजगी शाळांचे 4 लाख विद्यार्थी 'हर घर तिरंगा' अभियानात सामील होणार तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरिकांना सुद्धा स्वस्त दरात झेंडा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच शहरातील प्रमुख 75 चौकात रोषणाई सुद्धा करण्यात येणार आहे. 


मनपाच्या या पुढाकाराला साथ देत शहरातील सर्व स्वयंसेवी संस्था, नागरिक सर्वांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून स्वातंत्र्याच्या गौरवशाली 'हर घर तिरंगा' अभियानात सामील व्हावे, असे आवाहन मनपाचे आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी केले आहे. या बैठकीत अतिरिक्त आयुक्त दीपक कुमार मीना आणि राम जोशी, मुख्य अभियंता प्रदीप खवले, उपायुक्त रवींद्र भेलावे, उपायुक्त (घन कचरा) डॉ गजेंद्र महल्ले, उपायुक्त विजय हुमणे, उपायुक्त मिलिंद मेश्राम, उपायुक्त अशोक पाटील, अधीक्षक अभियंता मनोज तालेवार, कार्यकारी अभियंता अजय मानकर, डॉ. श्वेता बॅनर्जी, सोनाली चव्हाण, कमलेश चव्हाण, शिक्षणाधिकारी प्रीती मिश्रीकोटकर, सहायक आयुक्त सर्वश्री महेश धामेचा, प्रकाश वराडे, हरीश राऊत, गणेश राठोड, किरण बगडे, क्रीडा अधिकारी  पीयूष आंबुलकर आदी उपस्थित होते.


मनपा अधिकारी आणि कर्मचारी करणार निधी गोळा


मनपा आयुक्तांनी सांगितले की, शाळेतील विद्यार्थ्यांच्या मार्फत झेंड्याचे वितरण करावे, मनपा शाळातील विद्यार्थ्यांना मनपा अधिकारी आणि कर्मचारी निधी गोळा करून झेंडे देणार आहेत. तसेच खाजगी शाळेतील विद्यार्थ्यांना मात्र 15 रुपयात झेंडे उपलब्ध केले जाणार आहेत. नागपुरात 700 च्या वर शाळा आहेत आणि तेथील 4 लाखापेक्षा जास्त विद्यार्थ्यांना झेंडे उपलब्ध करण्याचे लक्ष्य आहे. याव्यतिरिक्त आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरिकांपर्यंत सुद्धा स्वस्त दरात झेंडे पुरवण्यात येतील. काही संस्थांनी मोठ्या प्रमाणात झेंडे विकत घेऊन नागपूर महानगरपालिकेला उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. हे झेंडे सुद्धा नागरिकांना दिले जातील.


Nagpur : 150 वर्ष जुन्या वडाच्या झाडाला मिळाले नवजीवन, पर्यावरणप्रेमींकडून अभिनंदन


75 चौकांत आकर्षक रोषणाई


आयुक्तांनी शहरातील प्रमुख 75 चौकात रोषणाई करण्याचे सुद्धा निर्देश दिले. तसेच मनपा मुख्यालय, झोनल कार्यालय आणि इतर ठिकाणी सुद्धा रोषणाई करून 'स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव' मोठ्या उत्साहाने साजरा करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. त्यांनी आवाहन केले की, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त साजरा होणाऱ्या या अभियानातही प्रत्येक संस्थेने आपले महत्वपूर्ण योगदान द्यावे. शहरातील प्रत्येक घरावर तिरंगा फडकविला जावा यासाठी आर्थिकदृष्ट्या कमकुवत लोकांना तिरंगा ध्वज खरेदी करून वितरीत करण्यासाठी पुढाकार घ्यावा. अतिरिक्त आयुक्त दीपक कुमार मीना आणि राम जोशी यांनी यावेळी  'हर घर तिरंगा' अभियान राबविताना ध्वज संहितेचे पालन होणे अत्यावश्यक असून त्यादृष्टीने सर्वांनी ध्वज संहितेचे पालन करण्याचे आवाहन केले.