गोवा : तब्बल 1208 पुस्तके लिहून मराठी साहित्यविश्वात अमूल्य योगदान देणारा लेखक सध्या आर्थिक हालाखीच्या स्थितीत आहे. आजारपण आणि आर्थिक चणचणीतून बाहेर पडण्यासाठी मराठीतले नामवंत रहस्यकथाकार गुरुनाथ नाईक धडपडत आहेत.

कॅप्टन दीप, गोलंदाज, धुरंधर, शिलेदार, गरूड, शब्दवेधी, रातराणी ही व्यक्तिरेखांची नावं उच्चारताच ज्यांची आठवण होते आणि ज्यांनी तब्बल 1208  रहस्यमय कादंबऱ्या लिहिल्या आहेत, असे विक्रमवीर लेखक आणि ज्येष्ठ पत्रकार गुरुनाथ नाईक सध्या गोव्यात विपन्नावस्थेशी आणि आजारांशी झुंज देत आहेत.

79 वर्षांचे गुरुनाथ नाईक गेली 12 वर्ष ब्रेन स्ट्रोकच्या आजाराने ग्रस्त आहेत. आता त्यांच्या छातीत इन्फेक्शन झाल्याने त्यांच्यावर गोव्यातील मणिपाल रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

नाईक हे मूळचे गोव्यातील डिचोली तालुक्यातील साखळी येथील आहेत. गोव्यातील काही पत्रकारांच्या पुढाकाराने गोवा सरकारकडून निवासासाठी भाड्याने सरकारी फ्लॅट मिळाला आहे आणि गोवा सरकारची दरमहा 3 हजार 200 रुपयांची पेन्शनही त्यांना मिळते. जेमतेम 3 हजार 200 रूपयात गुरुनाथ नाईक यांना आजरपण आणि घरखर्च यांची सांगड घालावी लागत आहे.

गुरुनाथ नाईक आणि त्यांच्या पत्नीच्या उदरनिर्वाहासाठी आणि औषधोपचारांसाठी अन्य कोणतेही उत्पन्नाचं साधन नाही. त्यांच्या निवडक पुस्तकांचे नव्याने संच काढून त्यातून त्यांना काही घसघशीत आर्थिक तरतूद करून देण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. मात्र, हा प्रकल्प प्रत्यक्षात येण्यासाठी आणखी काही काळ जाईल.

गुरुनाथ नाईक यांचा मुलगा लातूरमध्ये एमएस्सीचं शिक्षण घेत आहे आणि तो कॉलेज खर्चही अर्धवेळ नोकरी करुन भागवतो. नाईक यांना आर्थिक मदतीची गरज आहे.

ज्यांना गुरुनाथ नाईक यांना मदत करण्याची इच्छा आहे, त्यांच्यासाठी बँक खात्याची माहिती देत आहोत :