Navi Mumbai News : नवी मुंबईतील (Navi Mumbai) भूखंडांचे दर गेल्या काही दिवसात गगनाला भिडत आहेत. सिडकोच्या (CIDCO) ऐरोली, घणसोली, वाशी, नेरुळ, बेलापूर, खारघरमधील काही मोक्याच्या भूखंडांसाठी जास्त रकमेची बोली प्राप्त झाली होती. त्यामुळे सिडकोच्या भूखंड घेण्यासाठी विकासकांमध्ये देखील स्पर्धा लागलेली पाहायला मिळत आहे. त्यामुळेच सिडको महामंडळाने विविध ठिकाणच्या 28 भूखंड विक्रीसाठी विकासकांना चांगलाच प्रतिसाद लाभला आहे. सानपाडामधील (Sanpada) भूखंडासाठी आजवरचा सर्वात जास्त दर मिळाला आहे. पामबीच मार्गावरील सानपाडा, सेक्टर-20 मधील भूखंडासाठी 5 लाख 54 हजार 089 रुपये प्रति चौरस मीटर दराने बोली लावण्यात आली. तर सर्व्हिस इंडस्ट्रीसाठी असणाऱ्या भूखंडांसाठी सिडकोला कमी दर प्राप्त झाला आहे. दरम्यान, 28 भूखंडांच्या विक्रीतून सिडकोला 1365 कोटी रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले आहे.
कोणकोणत्या भूखंडांना किती बोली?
सिडको महामंडळाने आपल्या कार्यक्षेत्रातील 28 भूखंडांच्या विक्रीसाठी भूखंड विक्री योजना-31 जाहीर केली होती. या माध्यमातून ऐरोली, घणसोली, कोपरखैरणे, सानपाडा, नेरुळ, वाशीमधील जवळपास 5 हेक्टर जागा निवासी आणि व्यावसायिक वापरासाठी उपलब्ध करुन दिली होती. त्यापैकी सानपाडा सेक्टर-20 मधील भूखंड क्रमांक-9 बी या भूखंडाला नवी मुंबईतील आजवरचा सर्वात दर प्राप्त झाला आहे. 5526.94 चौ.मी. क्षेत्रफळाचा हा भूखंड निवासी आणि व्यावसायिक प्रयोजनासाठी राखीव असून डीपीयुजी वेन्चरद्वारे या भूंखंडासाठी 5,54,089 रुपये प्रति चौ.मी. इतकी बोली लावण्यात आली आहे. त्याखालोखाल शवती पिरॅमिड (4 लाख 79 हजार 551 रुपये प्रति चौ.मी.), जय अक्षर इकोशेल्टर (4 लाख 25 हजार 777 रुपये प्रति चौ.मी.) आणि स्पेस क्रिएशन्स प्रा. लि. (3 लाख 69 हजार 098 रुपये प्रति चौ.मी.) असे दर संबंधित भूखंडाला प्राप्त झाले आहेत. या भूखंडासाठी 1.5 एफएसआय निश्चित करण्यात आला आहे.
सर्व्हिस इंडस्ट्रीसाठी राखीव भूखंडांसाठी सर्वात कमी बोली
दुसरीकडे सिडकोने विक्रीसाठी काढलेल्या 28 भूखंडांपैकी सर्व्हिस इंडस्ट्रीसाठी राखीव असणाऱ्या भूखंडांसाठी सिडकोला कमी दर प्राप्त झाला आहे. सर्व्हिस इंडस्ट्रीच्या भूखंडांसाठी 45 हजार ते एक लाख रुपये प्रति चौरस मीटर इतकी बोली लावण्यात आली आहे. निवासी-व्यावसायिक (रेसिडेन्शियल प्लस कमर्शिअल) भूखंडांसाठी 2 लाख 30 हजार 300 ते 5 लाख 54 हजार 089 रुपये प्रति चौरस मीटर असा दर सिडकोला प्राप्त झाला आहे. या सर्व 28 भूखंडांच्या विक्रीतून सिडकोला 1365 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.
दरम्यान, सानपाडा मधील भूखंडाला मिळालेला 5 लाख 54 हजार 089 रुपये प्रति चौरस मीटर दर नवी मुंबईमधील आजवरचा सर्वात जास्त भूखंड विक्री दर ठरला आहे. यापूर्वी भूखंड विक्री योजना-28 मध्ये नेरुळमधील भूखंडासाठी 3 लाख 85 हजार रुपये प्रति चौरस मीटर दराची बोली लागली होती.