नवी मुंबई : येत्या 30 ऑक्टोबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)  यांच्या हस्ते होणारं नवी मुंबई मेट्रोचे (Navi Mumbai Metro)  उद्घाटन पुन्हा अनिश्चित कालावधीपर्यंत पुढे ढकलण्यात आले आहे. नवी मुंबई मेट्रोच्या उद्घाटनासाठी एकाच महिन्यात पंतप्रधानांच्या चार वेळा तारखा जाहीर करून पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्यामुळे नवी मुंबई मेट्रोच्या उद्घाटनाला पंतप्रधान कार्यालयाकडून तारीख पे तारीख दिली जात असल्यामुळे राज्य शासनासह सिडको आणि जिल्हाधिकारी रायगड कार्यालयातील अधिकारी हवालदिल झाले आहेत. 


मागील बारा वर्षांपासून नवी मुंबईकर हे मेट्रोच्या प्रतीक्षेत आहेत. 1 मे 2011 रोजी नवी मुंबई मेट्रोचे भूमिपूजन तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले होते. तेव्हापासून या मेट्रोचा तिढा काही केल्या सुटत नाही. परंतु  सिडकोच्या नवी मुंबई मेट्रो प्रकल्पातील मार्ग क्र. 1 वरील सेंट्रल पार्क ते बेलापूर स्थानक या स्थानकांदरम्यान प्रवासी वाहतूक सुरू करण्याकरिता मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी परवानगी दिली होती. त्यामुळे  आता लवकरच बेलापूर ते पेंधर या संपूर्ण मार्ग क्र. 1 वर प्रवासी वाहतूक सुरू होणार अशी नवी मुंबईकरांना अपेक्षा होती. मात्र आता याच मार्गिकेचं  पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार   उद्घाटन पुढे ढकलण्यात आले आहे. 


कोणत्या स्थानकांचा समावेश?


नवी मुंबईच्या या मेट्रो 1 मार्गिकेमध्ये 11 स्थानकांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये  सीबीडी-बेलापूर, सेक्टर 7, सिडको सायन्स पार्क, उत्सव चौक, खारघर सेक्टर 11, खारघर, सेक्टर 14, खारघर सेंट्रल पार्क, पेठपाडा, खारघर सेक्टर 34, पाचनंद आणि पेंधर-तळोजा अशी स्थानके आहेत. यामुळे नवी मुंबईकरांच्या प्रवासाची चिंता आता मिटणार असल्याचं सांगण्यात येतय. मेट्रोची ही मार्गिका संपूर्ण नवी मुंबईच्या अंतर्गत भागातून जाते. त्यामुळे  या मार्गाचा खारघर नोडसह कळंबोली, रोडपाली आणि तळोजा परिसराला मोठा फायदा होणार आहे. 


कोणाला होणार मेट्रोचा सर्वाधिक फायदा? 


तळोजा ही मोठी औद्योगिक वसाहत आहे. शिवाय कळंबोलीचे स्टील मार्केट महामुंबईतील सर्वात मोठे स्टील मार्केट आहे. येथे रोज हजारो चाकरमानी ये-जा करत असतात. या चाकरमान्यांसाठी एनएमएमटीची बससेवा आहे. परंतु, ही बससेवा अतिशय अपुरी आहे. ही मेट्रो सुरू झाली तर या प्रवाशांसह बेलापूर, तळोजा परिसरातील विद्यार्थी आणि स्थानिकांना त्याचा मोठा लाभ होणार आहे.  त्यामुळे आता काहीच दिवसांत नवी मुंबईची मेट्रो ही प्रवाश्यांच्या सेवेमध्ये येणार असल्याचं सांगण्यात येत आहे. 


हे ही वाचा :


मुंबई, नवी मुंबईनंतर आता तिसरी मुंबई! मेगा प्लान तयार, ना सिग्नल ना चौक, आधुनिक रस्त्यांसाठी 12 हजार कोटी