नवी मुंबई  : नवी मुंबईतील बांधकाम व्यावसायिक गुरुनाथ चिचकरांनी सकाळी साडे सहाच्या सुमारास डोक्यात गोळी घालून आत्महत्या केली. ते आणि मोस्ट वॉन्टेड ड्रग्ज  सिंडिकेटचा प्रमुख नवीन चिचकरचे वडील होते. नवी मुंबई पोलिसांना गुरुनाथ चिचकरांची सुसाईड नोट सापडली असून त्यासोबत एक पत्र देखील आढळलं आहे.  या प्रकरणाचा नवी मुंबई पोलिसांकडून तपास सुरु आहे.  सुसाईड नोटमध्ये एनसीबीनं सहा वेळा चौकशीला बोलावल्याचा उल्लेख आहे. खूप त्रास होतोय, काही केलं असतं तर सहन केलं असतं, असंही चिचकरांनी नोटमध्ये म्हटलंय. 

गुरुनाथ चिचकरांचं पत्र

मा. विभागीय संचालकअंमली पदार्थ नियत्रण विभागमुंबई, महाराष्ट्रयासी ..................सस्नेह नमस्कार विनंती विशेषविषयः जीवन संपवण्याबाबतमहोदय,

मी गुरुनाथ चिचकर, राहणार किल्ले गावठाण, बेलापूर, नवी मुंबई या ठिकाणी राहत असून शपथ पूर्वक सांगतों की मागील काही दिवसांपासून माझ्या मनात जीवन संपवण्याचे विचार सातत्याने येत आहेत. त्याचे कारण आपणास माहीत आहे, कोकणातील एक साधा सरळ माणूस पोटा पाण्यासाठी मुंबईत येतो. मुंबई पोर्ट ट्रस्ट मध्ये लोडर म्हणून तीस वर्ष नोकरी करतो. नोकरी करीत असतानाच पत्नीच्या नावे व्यवसाय करून बांधकाम व्यवसायात जम बसवतो. त्यासाठी वेळप्रसंगी साम दाम दंड भेद निती वापरली पण कोणताही वाईट कृत्य किंवा वाईट व्यवसाय केला नाही. साधे सिगारेट पिण्याचे व्यसन लाऊन घेतले नाही. मित्र मंडळीना कंपनी देताना कधीतरी बिअर घेतली आहे. आता तर गेली काही वर्ष ते व्यसन ही सोडून दिले आहे. काहीतरी करून दाखवण्याचा जिद्दीने जीवन जगलो. आपण जो त्रास सोसला तो आपल्या मुलांना होऊ नये यासाठी जीवाचे रान केले. त्यांना उच्च शिक्षण देण्याचा प्रयत्न केला. मोठा मुलगा नवीनची सायकलॉजी मधील रुची बघून त्याला लंडन ला 2012 मध्ये उच्च शिकण्यास पाठवले. त्यासाठी कमविलेले काही विकले. मुलगा शिकला पाहिजे संपती तर काय कधीही परत मिळू शकते, गेलेले वैभव मुले परत मिळवून देतील. 

या एका आशेवर एका बापाने ही जोखीम उचलली. प्रत्येक कुटुंब वत्सल माणूस अशी रिस्क घेतो. तो तिकडे शिकत होता आणि मी इकडे मेहनत करत होतो दुसऱ्या मुलाचे आयुष्य सेटल करायचे होते. तिकडे त्याला कोणाची संगत लागली माहीत नाही पण तो एका वाईट  धंद्यात ओढला गेला. झटपट पैसा कमविण्याच्या नादात त्याने आम्हाला मानसिक त्रास दिला आहे. तो कोणता व्यवसाय करतो याची कल्पना आम्हाला हे सर्व प्रकरण उघड होईपर्यंत नव्हते. पाच वर्षा पूर्वी एक दिवस माझ्या मुलाचे पहिले अमली पदार्थ तस्करी प्रकरण उघड झाले. तो माझ्यासाठी आणि माझ्या पत्नीसाठी मोठा धक्का होता. यासाठीच त्याला शिकवले का असा प्रश्न पडला. ते प्रकरण आम्ही सोसले प्रचंड मानसिक आर्थिक त्रास झाला. तब्येत खराब झाली. त्यातून कसाबसा सावरल्या नंतर मी माझ्या मुलाशी सर्व संबंध तोडून टाकले. तसे कोर्टात लिहन दिले. वर्तमानपत्रात जाहीर केले. त्यावेळी त्यांनी मला प्रॉमिस केले की मी पुन्हा असा कोणताही व्यवसाय करणार नाही मी त्याच्यावर विश्वास ठेवला. जुन्या प्रकरणातून त्याला बाहेर काढण्यासाठी मी वकील शोधत होतो. वकिलाच्या सांगण्यावरून मी त्याला एकदा त्याने सांगितलेल्या

पत्राचा फोटो पेज नं.1

ठिकाणी भेटायला गेलो ते एक पंचतारांकित हॉटेल होते. वकीलपत्रावर त्याची सही घेऊन आम्ही काही दिवसापूर्वीच मागे आलो. गेली अनेक वर्ष तो भारतात आलेला नाही. त्यामुळं  तो सुधारला  असेल आणि एखादा चांगला व्यवसाय करत असेल या भ्रमात मी होतो.

पाच वर्षानंतर पुन्हा एका नवीन प्रकरणात सामील असल्याचं समोर आले, नेरुळ मध्ये नुकत्याच पकडण्यात आलेल्या अंमली पदार्थ साठ्यात माझा मुलगा सामील असल्याचं ऐकायला मिळाले. ह्या तस्करीमध्ये माझा एक भाचा जो माझ्याकडे मॅनेजरचे काम करीत होता तो पण सामील असल्याचं अंमली पदार्थ नियंत्रण अधिकारी सांगतात.  त्याला अटक करण्यात आली आहे.  तो सध्या तळोजा तुरुगांत आहे. हे माझ्यासाठी धक्कादायक आहे. हे कमी म्हणून की काय माझा छोटा मुलगा धीरचे नाव अधिकारी घेत आहेत. त्याला वॉरंट काढले गेले आहे. साहेब माझ्या मोठ्या मुलाला त्याच्या कर्माची फळे कायद्याने मिळणार आहेत. त्याबद्दल  माझे काही म्हणणे नाही पण ह्या सर्व प्रकरणात मी माझी पत्नी माझा छोटा मुलगा यांचा काहीही संबंध नाही. हे मी शपथपूर्वक सांगतो. माझ्या मुलानं केलेल्या व्यवहारात माझा माझ्या पत्नीचा किंव्हा माझ्या छोट्या मुलाचा काहीही आर्थिक किंव्हा शारीरिक संबंध आढळल्यास मी कोणतीही शिक्षा भोगायला तयार आहे. पण आम्हाला नाहक ह्या गुन्ह्यात अडकवू नये अशी हात जोडून विनंती आहे. तसे झाल्यास मला माझे जीवन संपवण्याशिवाय दुसरा पर्याय शिल्लक राहणार नाही. हे प्रकरण घडल्यानंतर काही राजकीय पक्षाचे नेते आणि दलाल अधिकारी यांनी  मला दहा कोटी, तीन कोटी द्या ह्या प्रकरणातून तुम्हाला बाहेर काढतो अश्या ऑफर दिल्या आहेत. मुलाचा वाईट पैसा किंव्हा माझ्याकडे गैर मार्गाने कमविलेला पैसा असता तर मी ही ऑफ लगेच स्वीकारली असती आणि माझ्या कुटुंबाची सुटका करुन घेतली असती पण आपण माझी सर्व अकाऊंट तपासून बघा, माझ्याकडे असा कोणताही गैर मार्गाचा पैसा नाही. उलट माझ्यावर मर्चंट बँकेचे तीन कोटी कर्ज आहे, असे कर्ज घेऊनच मी व्यवसाय केला आहे. माझा मोठा मुलगा करीत असलेल्या गैरधंद्याअगोदर  मी जी काही संपती जमा केली आहे ती आहे, याचे सर्व कागदोपत्री पुरावे आहेत. माझ्या मुलाचे काळे धंदे माहीत नसताना त्याने केलेली काही आर्थिक मदत असू शकते. पण त्याच्या शिक्षणावर केलेला खर्च तो मला परत करीत आहे असे समजून ती मदत मी अनवधानाने घेतली असेल.

माझे जीवन अतिशय कष्टप्रद जगलो आहे.  आजही मेहनत करण्याची तयारी आहे. पण ही नाहक बदनामी आता सहन होत नाही. जीवन जगणे असह्य झाले आहे. अशा वेळी जीवन संपवण्याचे विचार मनात सातत्याने येतात. एका बापाचे हृदय आपण समजू शकता. अशी मी अशा करतो. आई वडील कष्ट करून मुलाना चांगले आयुष्य देण्याचा प्रयत्न करतात पण त्यांचे कर्म त्यांना वेगळ्या मार्गावर घेऊन जाते त्यात त्याच्या आई वडिलांचा काय दोष आहे? ज्याला आपण भगवान मानतो. ज्याची आपण पूजा करतो. ज्याची भगवद गीता सर्वत्र प्रमाण मानली जाते. त्या भगवान कृष्णाला 80 मुलगे होते पण एकही मुलगा जगला नाही. अशाच वाईट कृत्य करन ही 80 मुले आपापसात भांडत लढून मृत्यू पावली. त्यालाच आपण यादवी म्हणतो. त्या भगवान कृष्णाची मुले त्यांची झाली नाहीत तर आपल्या सारख्या मानवाची मुले आपली होतील, आपला विचार करतील असे का समजू माझी फक्त एकच विनंती आहे. ह्या प्रकरणात आमच्या सारखे निष्पाप लोक अडकता कामा नये. या पापात सामील आहेत त्यांना शिक्षा झाली पाहिजे. बस एवढीच अपेक्षा आहे. 

आपला नम्र

गुरुनाथ चिचकर

प्रत रवाना१) मा. अमित शहा, गृहमंत्री भारत सरकार२) मा. देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री, महाराष्ट्र३) मा. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र४) मा. मुख्य नियंत्रकअंमली पदार्थ नियंत्रण विभाग५) मा. पोलीस आयुक्तनवी मुंबई पोलीस आयुक्तालय६) मा. मंदा ताई म्हात्रेआमदार बेलापूर