Amit Thackeray: मनसे नेते अमित ठाकरे यांनी नवी मुंबईमधील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनधिकृतपणे उद्घाटन केल्यानंतर त्यांच्यावर नेरुळ पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता. गुन्हा नोंद झाल्यानंतर नेरुळ पोलीस त्यांना नोटीस देण्यासाठी शिवतीर्थवर पोहोचले होते. मात्र तुम्ही इकडे येण्याचा त्रास कशासाठी घेतला? मीच तिकडे येऊन नोटीस स्वीकारतो असे म्हणत अमित ठाकरे यांनी नोटीस स्वीकारली नव्हती. आज (23 नोव्हेंबर) त्यांनी नेरूळमध्ये जात विराट शक्तीप्रदर्शन करत पहिल्या केसचे एक प्रकारे जोरदार सेलिब्रेशन केलं. अमित ठाकरे यांचं नवी मुंबईमध्ये आगमन झाल्यानंतर मनसैनिकांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. शिवरायांच्या मूर्तीला अभिवादन केल्यानंतर अमित ठाकरे यांनी चालतच नेरूळ पोलीस स्टेशन गाठलं. नेरूळ पोलीस स्टेशनमध्ये पायी गेल्यानंतर अमित यांनी नोटीस स्वीकारली.
जगाला आपले गडकिल्ले समजले पाहिजेत
यानंतर अमित ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली. ते म्हणाले की मी शुक्रवारी या ठिकाणी येणार होतो. मात्र पोलिसांनी रविवारी येण्याची विनंती केली. शिवरायांचा पुतळ्या उद् घाटन केल्याने आपल्यावर पहिली केस पडली हे भाग्याचं असल्याचं अमित ठाकरे म्हणाले. ते म्हणाले की गडांचे संवर्धन करणे हे माझं स्वप्न आहे. जगाला आपले गडकिल्ले समजले पाहिजेत असे ते म्हणाले. गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी मोहीम हाती घेणार असल्याचेही अमित ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.
मग चार महिने झोपले होते का?
अमित ठाकरे पुढे म्हणाले की, भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या राजकारणामध्ये पुतळ्याचे अनावरण गेल्या काही महिन्यापासून रखडलं होतं. सेनेनं मला पाठिंबा दिला, मग चार महिने झोपले होते का? अशी विचारणा त्यांनी केली. राज ठाकरे आणि मनसे कार्यकर्त्यांनी मला प्रोत्साहन दिल्याने मी हे काम केल्याचं अमित ठाकरे म्हणाले. आपल्याकडे जात, धर्म, हिंदू, मुस्लिम आणि लाडकी बहीण चालते. मात्र, पर्यावरण आणि इतर विषयाला महत्त्व नसल्याचे अमित ठाकरे म्हणाले. भाजपच्या वॉशिंग मशीनमध्ये सर्व स्वच्छ होतात. दारू, जमीन घोटाळ्याच्या केसेस मी घेतल्या नसल्याचा टोला सुद्धा त्यांनी लगावला.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण
दरम्यान, अमित ठाकरे 16 नोव्हेंबरला रोजी नवी मुंबई दौऱ्यावर असताना शाखेच्या उद्घटनासाठी आले होते. यावेळी नेरूळ येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण गेल्या अनेक महिन्यांपासून झालेलं नाही. महाराजांची मूर्ती कापडाने झाकून ठेवल्याचे दिसून येताच अमित ठाकरे यांनी पुतळ्याचे अनावरण केलं होतं. यावेळी पोलीस आणि मनसैनिकांमध्ये काही काळ झडपही झाली. या कृत्यासाठी माझ्यावर कारवाई होते असेल तर ही माझ्या आयुष्यातील पहिली केस होणार आहे. मात्र वेळ आली तर महाराजांसाठी अशा अनेक केसेस अंगावर घेवू, असा पवित्र अमित ठाकरेंनी घेतला होता.
इतर महत्वाच्या बातम्या