Amit Thackeray :  नवी मुंबईत (Navi Mumbai) आज माथाडी कामगार आणि मनसैनिकांमध्ये (MNS Workers) जोरदार राडा झाला. खारघर मधील मेडिकव्हर रुग्णालयाच्या बाहेर मोठा राडा झाला. माथाडी कामगाराचे नेते महेश जाधव (Mahesh Jadhav) या रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांच्या समर्थकांसाठी मनसैनिकांना पळवून पळवून हाणले. मनसे नेते अमित ठाकरे (Amit Thackeray) यांनी शिवीगाळ करत मारहाण केली असल्याचा आरोप जाधव यांनी केला. राज ठाकरे यांची टीम ही खंडणी गोळा करत असल्याचा आरोपही जाधव यांनी केला. महेश जाधव हे मनसेचे उपाध्यक्ष आणि मनसे माथाडी कामगार युनियनचे अध्यक्ष आहेत. 


मनसेचे माथाडी कामगार नेते असलेले महेश जाधव यांनी थेट अमित ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. महेश जाधव यांच्यावर सध्या खारघर मधील मेडिकव्हर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यावेळी त्याठिकाणी आलेल्या मनसैनिकांना जाधव यांच्या कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केली. एका सोसायटीमध्ये लपायला गेले असता सोसायटीच्या सिक्युरिटी रूमच्या काचा माथाडी कामगारांनी फोडल्या. मनसेच्या दोन गटात झालेल्या या मारहाणीमुळे खारघर परिसरात काहीसे तणावाचे वातावरण आहे. 


अमित ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप


महेश जाधव यांनी आमित ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले. राज ठाकरे यांच्या घरी बोलवून आपल्याला अमित ठाकरे यांनी शिविगाळ करत बेदम मारहाण केल्याचा आरोप महेश जाधव यांनी केला आहे. 


महेश जाधव यांनी म्हटले की, मी माथाडी कामागारांची बाजू घेतली म्हणून मला मारहाण करण्यात आली. अमित ठाकरे यांच्याकडून राजगड या कार्यालयात मारहाण करण्यात आली. मला माथाडी कामगार संघटनेतून कमी करण्याचा प्रयत्न झाला. आपण पक्षातून राजीनामा देण्याची तयारी दर्शवली. पण, राजगड कार्यालयात आपण काही माथाडी कामगारांसह गेलो. त्यावेळी माझी बाजू ऐकून न घेता अमित ठाकरे यांनी आपल्याला शिविगाळ केली आणि एका भारदस्त वस्तूने मारहाण केली. या मारहाणीत डोक्याला गंभीर दुखापत झाली असून सहा टाके लागले असल्याचे जाधव यांनी म्हटले.