Navi Mumbai APMC Mango : गुडीपाढव्याच्या मुहूर्तावर नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये (Navi Mumbai APMC) हापूस आंब्याची (Alphonso Mango) आवक मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. दरवर्षी पेक्षा या वर्षी गुडीपाढव्याला (Gudi Padwa 2023) होणारी आवक जास्त असल्याने आंब्याचे दर सुद्धा खाली आले आहेत. सध्या दिवसाला 60 ते 65 हजार हापूस आंब्याच्या पेट्या एपीएमसी मार्केटमध्ये येत आहेत. यामध्ये कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमधून साधारण 45 हजार हापूस पेटी येत असून 15 ते 20 हजार पेट्या कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेशमधून दाखल होत आहेत.
आवक वाढल्याने आंब्याचे दर उतरले
आंबा जास्त येऊ लागला असल्याने दर सुद्धा सध्या कमी झालेले आहेत. पिकलेला हापूस आंबा 600 ते 1600 रुपये डझन विकला जात असून हिरवा आंबा 400 ते 1 हजार रुपयाने विकला जात आहे. दरम्यान राज्यात तीन ते चार दिवस अवकाळी पाऊस पडत असला तरी कोकणात तो पडला नसल्याने आंब्यावर याचा परिणाम झालेला नाही. या वर्षी मार्च महिन्यात मोठी आवक असली तरी एप्रिलमध्ये हापूस आंब्याची आवक कमी राहिल, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत.
गुढीपाडव्याचा मुहूर्त साधून आंबा बागायतदारांकडून व्यवसायाची सुरुवात
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विचार केल्यास हजारो हेक्टरवर आंबा बागा असून त्यातून दरवर्षी कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यातून गुढीपाडव्याचा मुहूर्त साधत आंबा बागायतदार आपल्या हापूस व्यवसायाची सुरुवात करतात. मोठ्या प्रमाणात पेट्या बाजारात दाखल होतात. सर्वसामान्यांपासून प्रत्येक जण यावेळी आंबा खरेदी करतो. यंदा कोकणातून गुढीपाडव्याच्या मुहूर्ताला नवी मुंबईतील वाशी मार्केटमध्ये जाणाऱ्या पेट्यांची संख्या वाढली आहे. शिवाय इतर राज्यातील आंबाही दाखल झाला आहे. त्यामुळे आंब्याचे दर सुद्धा कमी झाल्याने ग्राहकांना मनमुरादपणे आंबा खाता येणार आहे.
अहमदनगरच्या बाजारात आंबा दाखल
गुढीपाडव्याच्या दिवशी पूजेत आंबा (Mango) ठेवल्यानंतर आंबा खाण्यासाठी सुरुवात केली जाते. त्यानिमित्ताने अहमदनगरच्या बाजारामध्ये (Ahmednagar Market) आंबा दाखल झाला आहे. देवगड हापूस, रत्नागिरी हापूस, म्हैसूर आंब्याला नगरच्या बाजारात जास्त मागणी आहे. 700 रुपयांपासून ते 1200 रुपये पेटीप्रमाणे आंब्याचे दर आहेत. कालपासून आंबा खरेदीसाठी ग्राहक बाजारात येत असल्याचे विक्रेते सांगतात. अवकाळी पावसाचा विशेष असा फटका आंब्याला बसला नसल्याचे व्यापारी सांगतात. दरवर्षीप्रमाणेच बाजारात आंब्याची चांगली आवक असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.