नाशिक : नाशिकच्या डोंगरे वसतिगृह मैदानावर दरवर्षी आनंद मेळा भरतो. हा मेळा लागला की बच्चे कंपनींसह मोठ्यांचीही पावलं त्या दिशेनं पडू लागतात. या मेळ्यातील एका स्टॉलमध्ये दाखल झालेल्या नाशिककरांची मान आपसूकच उंच होते. कारण देशातील सर्वात उंच तरुणानं आपलं प्रदर्शन भरवलं आहे.

उत्तर प्रदेशमधील प्रतापगडाचा धर्मेंद्र प्रताप सिंग आपल्या 8 फूट 1 इंच उंचीमुळे प्रचंड लोकप्रिय झाला आहे. उंचपुऱ्या धर्मेंद्रला कुर्ता शिवण्यासाठी दहा मीटरचं कापड लागतं. पायात तब्बल 20 नंबरची चप्पल लागते, तर झोपण्यासाठी 9 बाय 6 फुटाचा बेड लागतो.

त्याला पाहण्यासाठी 10 रुपये तिकीट ठेवण्यात आलं आहे. तर सोबत फोटो, सेल्फी काढायचा असल्यास 20 रुपये मोजावे लागतील.

धर्मेंद्रच्या हातात कोणताही मोबाईल दिला, तरी तो काडेपेटीच्या आकारासारखाच भासतो. मात्र एवढ्या उंचीमुळे धर्मेंद्रला अनेक अडचणींचाही सामना करावा लागतो.

इतकी उंच व्यक्ती पहिल्यांदाच पाहायला मिळाल्यानं नाशिककरांच्या चेहऱ्यावर आश्चर्य, कुतुहल असे भाव उमटत आहेत.

अनंत अडचणी असतानाही सकारात्मक दृष्टीकोन ठेवून धर्मेंद्र आपलं आयुष्य जगतो आहे. दहा, वीस रुपयांच्या मोबदल्यात त्याच्याकडून थोडी जरी प्रेरणा घेतली तरी आपल्यालाही यशाची उंची गाठण्यास प्रेरणा मिळेल.