नाशिक : कोरोनाने पतीच्या निधनानंतर पप्पा कुठे आहेत? या मुलीच्या सततच्या प्रश्नांसमोर निरुत्तर झालेल्या मातेन पोटच्या गोळ्यासह गळफास घेत जीवनयात्रा संपवली. ही धक्कादायक घटना नशिकमध्ये घडलीय. या महिलेने मृत्यूपूर्वी लिहिलेली चिट्ठी मन सुन्न करतेय. या घटनेने नाशिक शहरात हळहळ व्यक्त होत आहे.


अवघ्या सहा महिन्यात सुखी कुटुंबाची वाताहात झाली. कुटुंबाचा शेवट नियती किती क्रूर आहे, हेच दर्शविते. पेशाने वकील असणारे प्रवीण तेजळे यांचे 14 एप्रिलला कोरोनाने निधन झाले, त्यांच्या पश्चात 7 वर्षीय मुलगी अनया आणि पत्नी सुजाता होत्या. वडिलांच्या मृत्यूबाबत मुलीला कल्पना नव्हती, त्यामुळे ती आपल्या आईला पप्पा कधी येतील? कुठे आहेत? असे प्रश्न रोज विचारायची. आज येतील, उद्या येतील, 8 दिवसांनी येतील असे आई सांगत होती. पप्पा देवाघरी गेलेत असे आई सांगत होती. मात्र, वडिलांच्या अंगाखांद्यावर, लाडात वाढलेल्या अनयाची वडिलांना भेटण्याची तीव्र इच्छा कमी होत नव्हती. तू देवाची पूजा कर असे आईने सांगितले. मात्र, पूजा करूनही वडील परत आले नसल्यानं मुलीने आपणच पप्पाकडे देवाघरी जाऊ असे सुचविले. त्यानंतर आईने नको ते टोकाचे पाऊल उचललं आधी मुलीची हत्या करून गफळास घेऊन आत्महत्या केली.


लोक काय म्हणतील याचा विचार न करता निर्णय घेत असल्याचं या मातेन चिठ्ठीत लिहिले आहे. या घटनेची मुंबई नाका पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आलीय. मृत्यूपूर्वी चिठ्ठी सापडल्याने त्या आधारे पुढील तपास पोलीस करत आहेत.


मृत्यूपूर्वीची चिठ्ठी..


मी सुजाता प्रवीण तेजाळे 
मी माझ्या स्वतःच्या इच्छेने आयुष्य संपवत आहे, पत्रास कारण की..


माझे पती प्रवीण पंडित तेजाळे हे अचानक कोरोनात गेले, तेव्हापासून माझे आयुष्य संपल्यासारखं आहे. आयुष्य खूप मोठा असतं पण एकट्याने राहण्यात अर्थच नाही, ना कुणाशी बोलण्याची इच्छा, ना कुणाला भेटण्याची इच्छा होते. परंतु, इतके दिवस फक्त मुलीसाठी कसेतरी आयुष्य काढत होते. सध्या ती खूप लहान आहे, पुढे तिचे देखील आयुष्य आहे. परंतु, तिलाही पप्पांची सतत आठवण येते, पप्पा तारा झाले आहेत, देवाघरी गेले आहे, हे मी तिला काही दिवसांपूर्वी समजावून सांगितले. पूजा केल्यानंतर पप्पा येतील हे मी तिला समजावून सांगितल्यानंतर काही दिवस ती शांत राहिली. आता मात्र पुन्हा ती सतत पप्पा कधी येणार हा एकच प्रश्न मला विचारत राहते, मी पूजा केली तरीही पप्पा का येत नाही. या तिच्या प्रश्नाला मी काय उत्तर देऊ? आज सकाळी झोपेतून उठल्यावर अचानक ती मला म्हणाली मम्मी पप्पा नाही तर तू पण दुःखी राहते, मी पण sad राहते. आपण पप्पांकडे जाऊयात. तिच्या या प्रश्नावर मी आज खूप विचार केला. जर पुढे मलाच काही झालं तर तिचं काही होईल, तिला सोडून जाणं शक्य नाही. म्हणून तिच्या त्याप्रमाणे मीही करणार आहे, आमच्या दोघींच्या आयुष्यात आता सुख नाही. आयुष्यात जगण्यासाठी पैसा सर्व काही नसतो, असं आयुष्य काढणं खूप कठीण आहे. जसा जन्म देताना त्रास झाला तसं थोडं मन घट्ट करुन हे करणार आहे. आणि हे करताना तिला सांगणार आहे की आपण आता पप्पांकडे चाललो आहोत. अशी समजूत काढत आमचे आयुष्य मी आता संपत आहे. ह्यात मी जन्म देती वैरीण नाही. ह्या जगात खूप वाईट आणि विचित्र लोक आहेत. म्हणून हा असाही बराच विचार करून तिला जसा जन्म दिला तसेच तिची काळजी करून तिला सोबत घेऊन चालले आहे.


बापाशिवाय अर्थ नाही आणि नवऱ्याशिवायही अर्थ नाही..