शेकडो लोकांची फसवणूक करणारा विनय फडणीस मुंबईतून अटक
Continues below advertisement
नाशिक : फडणीस ग्रुपचा सूत्रधार विनय फडणीसला मुंबईतील विक्रोळीतून अटक करण्यात आली आहे. नाशिकच्या आर्थिक गुन्हे शाखेने कारवाई केली. विनय फडणीसला 29 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी न्यायालयाने सुनावली आहे.
फडणीस ग्रुपविरोधात आजवर नाशिकमध्ये शेकडो नागरिकांची जवळपास 11 कोटी रूपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. मूळच्या पुण्याच्या असलेल्या फडणीस ग्रुप आणि विनय फडणीस विरोधात आतापर्यंत फसवणूक केल्याप्रकरणी नाशिकमध्ये पाच गुन्हे दाखल आहेत.
फडणीस ग्रुपचा घोटाळा काय?
केबीसी, हाऊस ऑफ इन्व्हेसमेंट, मैत्रेय असे शेकडो कोटींचे घोटाळे नाशिकमध्ये उघडकीस आल्यानंतर फडणीस नामक एक नवीन घोटाळा नाशिकमध्ये चांगलाच चर्चेत आहे. गुंतवणुकीवर महिन्याला परतावा देण्याचे अमिष दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी पुण्यातील फडणीस ग्रुपवर काही महिन्यांपूर्वी नाशिकच्या मुंबई नाका पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आहे.
गुन्हा दाखल झाल्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेकड़े तपास वर्ग करण्यात आला होता. मात्र गुन्हा दाखल होऊन यासोबतच दीडशेच्या वर तक्रारी देऊन अनेक महीने उलटून देखिल फडणीस ग्रुपच्या संचालकांना अटक झाली नव्हती. मात्र, अखेर विनय फडणीसला मुंबईतील विक्रोळीतून अटक करण्यात आली आहे.
विनय फडणीस कोण?
फडणीस हा मूळचा पुण्यातील ग्रुप असून महाराष्ट्रातील बऱ्याच ठिकाणी बांधकाम क्षेत्र, रिअल इस्टेट, हॉटेल व्यवसायामध्ये ते अनेक वर्षापासून कार्यरत आहेत. मागील 2 ते 3 वर्षापासून ठेविदारांना त्यांचे व्याज तसेच मुद्दल देखिल मिळाली नसून त्यांच्या सांगण्यानूसार फडणीस ग्रुपचे महाराष्ट्रातच 8000 च्या आसपास गुंतवणूकदार असून नाशिकमध्येच 2000 गुंतवणूकदार आहेत. एकूण तब्बल 300 कोटींचा हा घोटाळा असण्याची शक्यता वर्तवली जाते आहे.
Continues below advertisement