मुंबई : भारताचा आघाडीचा रोईंगपटू दत्तू भोकनाळने आपल्यावरील गुन्हा रद्द करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. दत्तू भोकनाळच्या पत्नीने त्याच्याविरोधात आयपीसी कलम 498(ए) अंतर्गत कौटुंबिक हिंसाचार आणि कलम 420 अंतर्गत फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
दत्तू भोकनाळला येत्या 2 ऑगस्टला ऑस्ट्रियात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय रोईंग अजिंक्यपद स्पर्धेत सहभागी व्हायचं आहे. त्यामुळे हा गुन्हा तातडीनं रद्द करावा यासाठी ही याचिका दाखल करण्यात आली आहे. मंगळवारी न्यायमूर्ती रणजित मोरे आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठापुढे ही याचिका सादर करण्यात आली. त्यावर बुधवारी यावर तातडीची सुनावणी घेण्याचं हायकोर्टानं मान्य केलं आहे.
भारताचा आघाडीचा ऑलिम्पियन आणि आशियाई खेळात सुवर्ण पदक विजेता दत्तू भोकनाळ विरुद्ध त्याच्या पत्नीनं नाशिक पोलिसांत तक्रार दिली आहे. 22 डिसेंबर 2017 ते 3 मार्च 2018 या काळात आपल्या पतीनं आपला प्रचंड मानसिक आणि शारिरीक छळ केला आहे. दत्तू भोकनाळने आपल्यासोबत हिंदू वैदिक पद्धतीनं विवाह केला. त्यानंतर रितसर लग्नाचं दोनवेळा आश्वासनही दिलं, असं या तक्रारीत नाशिक ग्रामीण पोलीस दलात असलेल्या त्याच्या पत्नीनं म्हटलं आहे. या प्रकरणी अद्याप कुणालाही अटक झालेली नाही.
भारतीय सेनादलात कार्यरत असलेला दत्तू भोकनाळ हा साल 2016 च्या रिओ ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणारा पहिला भारतीय रोईंगपटू ठरला होता. त्यानंतर त्यानं साल 2018 च्या आशियाई खेळांत भारताला सुवर्णपदक मिळवून दिलं आहे.
पत्नीकडून दाखल कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा रद्द करा, रोईंगपटू दत्तू भोकनाळ हायकोर्टात
अमेय राणे, एबीपी माझा, मुंबई
Updated at:
23 Jul 2019 07:06 PM (IST)
दत्तू भोकनाळला येत्या 2 ऑगस्टला ऑस्ट्रियात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय रोईंग अजिंक्यपद स्पर्धेत सहभागी व्हायचं आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -