नाशिक : प्रजासत्ताक दिनानिमित्त नाशिकमध्ये आयोजित कार्यक्रमात देशभक्तीपर गाण्यांवर नृत्यांगनांनी अश्लील नृत्य केलं. भाजपचे आमदार डॉक्टर अपूर्व हिरेंची उपस्थिती असलेल्या या कार्यक्रमात नृत्यांगनांवर पैसेही उधळण्यात आले. सिडको परिसरातील कामठवाड्यामध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.


काल प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित भोजपुरी कार्यक्रमात देशभक्तीपर गाण्यांवर चक्क अश्लील नृत्यांचा कार्यक्रम पार पडला. सिडको परिसरात कामठवाड्यातील माऊली लॉन्समध्ये शुक्रवारी हा कार्यक्रम  आयोजित कऱण्यात आला होता. विशेष म्हणजे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सत्ताधारी भाजपचे शिक्षक आमदार आमदार डॉक्टर अपूर्व हिरे हे उपस्थित होते. शिवसेनेचे माजी विभागप्रमुख बसिष्ठ श्रीवास्तव यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता.

दरम्यान या सर्व प्रकाराबाबत आमदार अपूर्व हिरे यांनी, “मी फक्त 10 मिनिटे या कार्यक्रमाला उपस्थित होतो, तसंच मला इथे बोलावून घेण्यात आलं होतं आणि माझ्याकडून भोजपुरी मंडळींचा सत्कारही करून घेण्यात आला” असं स्वीय सहाय्यकामार्फत स्पष्ट केलं आहे. तसंच या कार्यक्रमातील नृत्य आणि मुलींवर उधळले गेलेले पैसे हा देशाचा अवमान नसून हा त्या मुलींचा सन्मान, बक्षीस आणि लोकांचा उत्साह असल्याचं आयोजकांनी सांगितलं आहे.

पाहा व्हिडीओ :