नाशिक : ग्रामपंचायत निवडणुकीचा धुरळा उडू लागलाय. त्याचवेळी निवडणूक बिनविरोध करण्यासाठी लोकप्रतिनिधीसह ग्रामस्थांचा पुढाकार ही बघायला मिळतोय. अनेक गावांत विकास कामासाठी बोलीही लावली जात असून जणू बाजाराच भरलाय की काय अशी परिस्थिती आहे. यावर सारवासारव करण्यासाठी कोणी हा विकासासाठी "निधी असे गोंडस नाव देतो तर देणगी म्हणत सर्वच पावन करून घेतो". असाच एक व्हडिओ सध्या राज्यभर गाजतोय. हा व्हडिओ आहे नाशिक जिल्ह्यातील उमराणे गावाचा.
नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्याच्या उमराणे गावचे श्रद्धास्थान असणाऱ्या रामेश्वर महादेवाच्या साक्षीने सोमवारी ग्रामस्थांच्या बैठकीत बोलीला सुरुवात झाली आणि शेवट झाला तो तब्बल 2 कोटी 5 लाख रुपयांवर. राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. अनेक गावांत निवडणूक बिनविरोध करण्यासाठी लिलाव देखील सुरू आहेत. तसाच प्रकार इथेही घडल्याची राज्यभर चर्चा सुरू झाली. ग्रामस्थांनी मात्र ही बोली ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची नाही तर रामेश्वर महादेव मंदिराच्या जिर्णोद्धार करण्यासाठी असल्याचा दावा करायला सुरुवात केली.
मंदिराच्या जिर्णोद्धारासाठी 'सरपंच' पदासाठी बोली
महादेवाचे जागृत स्थान आहे, प्रभूरामचंद्र यांनी रामेश्वराची ही पिंड स्थापन केल्याची आख्यायिका ग्रामस्थ सांगतात, मंदिराचा जिर्णोद्धार अनेक वर्षांपासून रखडला आहे, सुरुवातीला मंदिर उभारणीसाठी 2 कोटी रुपये लागणार होते. मात्र, पैसा उभा राहीला नाही. आता बांधकाम खर्च थेट 8 कोटीपर्यंत जाऊन पोहचला आहे. मंदिराचे बांधकाम पुन्हा सुरू व्हावे यासाठी लोकवर्गणीतून पैसा उभा करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पैसा उभा झाला नाही. त्यामुळेच सोमवारी बोली लावण्यात आल्याचं ग्रामस्थ सांगत आहेत. उमराणे गाव कांदा बाजारासाठी प्रसिद्ध आहे. लासलगाव, पिंपळगाव खालोखाल इथं कांद्याचे व्यवहार होतं असतात. आजूबाजूच्या गावातील असंख्य शेतकरी उमराणे बाजार उपसमितीमध्ये कांदा विक्रीसाठी घेऊन येतात. कांदा आणि मका पिकांवरच गावाची बहुतांश उपजीविका अवलंबून आहे.
ग्रामपंचायतीसाठी बोली
18 हजार लोकसंख्या असणाऱ्या गावात नऊ हजारच्या आसपास मतदार आहेत. 6 वार्ड मिळून 17 सदस्यांची ग्रामपंचायत आहे. ऑगस्टमध्ये पंचायतीची मुदत संपुष्टात आली असून सध्या प्रशासकाची नेमणूक करण्यात आलीय. गेल्या अनेक वर्षांपासून विलास देवरे आणि प्रशांत देवरे यांच्याच पॅनलमध्ये लढाई होत असते. गत पंचवार्षिकमध्ये विलास देवरे गटाची सत्ता होती. यंदा मात्र प्रशांत देवरे यांच्या गटाने जोरदार प्रयत्न केले आहेत. त्यातच गावातील काही मंडळींनी निवडणूक बिनविरोध करावी यासाठी प्रयत्न सुरू केलेत. त्याचाच एक भाग म्हणून सोमवारी झालेल्या ग्रामस्थांच्या सभेकडे बघितले जात आहे. गावात लागलेली बोली निवडणुकीची नाही असा दावा काही ग्रामस्थ करत असले तरी देखील सत्तेवर येणाऱ्या पॅनलने केवळ मंदिराचा जीर्णोद्धारच नाही तर गावाचा विकास ही करावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. त्याच बरोबर बोली लावायचीच होती तर निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला असताना, आचारसंहिता काळात का बैठक बोलावली असा सवाल ही उपस्थित होतोय.
मंदिराच्या जीर्णोद्धारच्या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी बैठक बोलविण्याच्या आधीच अनेकांनी उमेदवारीसाठी अर्ज केलेत, गाव ठरवेल त्यांचेच अर्ज राहतील इतर माघार घेतील अशी शपथ रामेश्वराच्या साक्षीने घेण्यात आलीय. मात्र, तरही सर्वांना माघारीच्या दिवसाची प्रतिक्षा आहे. चार जानेवारीलाच खरे चित्र स्पष्ट होणार आहे. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीच्या ऐन रणधुमाळीत लागलेली 2 कोटींची बोली सध्यातरी चर्चेचा विषय ठरला असून निवडणूक बिनविरोध होते का? न झाल्यास ठरल्याप्रमाणे मंदिराचा जीर्णोद्धार केला जातो हे बघणं महत्वाचं आहे.
Maharashtra Gram Panchayat | नाशिकमध्ये सरपंचपदासाठी तब्बल 2 कोटी 5 लाखांची बोली