नाशिक: नाशिकमध्ये पुन्हा एकदा गाड्या पेटवण्याची घटना समोर येते आहे. काल (रविवारी) मध्यरात्री नाशिक-औरंगाबाद रोडवरील निलगिरी बाग इथल्या सम्राट बेकरीचे मालक शंकर वाडेकर यांच्या ३ गाड्या पेटवण्यात आल्या.
रात्री दीड वाजण्याच्या सुमारास आजूबाजूच्या घरांना बाहेरुन कडी लावून ही आग लावण्यात आली. यात दोन चारचाकी जळून खाक झाल्यात तर रिक्षाचं मोठं नुकसान झालं आहे. आग इतकी भीषण होती की शेजारच्या गोदामालाही त्याची झळ बसली आहे.
याप्रकरणी आडगाव पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं असून याप्रकरणी अधिक तपास सुरु आहे. दरम्यान, दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी नाशिककर करत आहेत. याआधी सिडको, सातपूर परिसरात गाड्या जाळण्याच्या घटना घडल्या होत्या. आता पंचवटी परिसरातही असे प्रकार सुरू झाल्यानं नागरिकांमध्ये सध्या भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.