नाशिक : नाशिमध्ये लग्नाचं वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या टेम्पोचा अपघात झाल्यानं माळी कुटुंबावर शोककळा पसरली आहे. नाशिक-मुंबई महामार्गावरील वाडीवऱ्हे गावाजवळ टेम्पो पलटी होऊन नवरदेवासह 40 जण जखमी झाले आहेत. तर दोन जणांचा मृत्यू झाला आहे.

जखमींपैकी पाच जणांची प्रकृती गंभीर असून सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आज (मंगळवार) सकाळी पाथर्डी फाटा परिसरातून असवलीकडे माळी कुटुंब वऱ्हाड घेऊन निघाले.  दुपारी 12च्या सुमारास वाडीवऱ्हेजवळ पोहोचताच चालकाचं टेम्पोवरील नियंत्रण सुटलं आणि टेम्पो पलटी होताच सर्व प्रवासी रस्त्यावर फेकले गेले.  ज्यात लहान मुलांचाही समावेश होता.

स्थानिक आणि नागरिकांच्या मदतीनं जखमींना जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. उपचारादरम्यान कार्तिक माळी या 5 वर्षाच्या मुलाचा आणि एका 28 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला.