नाशिक : घोटी टोलनाक्यावर एका टोल कर्मचाऱ्याचा ट्रकने चिरडल्यानं मृत्यू झाला. काल मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी ट्रकचालकाला अटक केली आहे. काल मध्यरात्री एका ट्रकचालकाने घोटी टोलनाक्यावर काम करणाऱ्या योगेश गोवर्धन कर्मचाऱ्याला धडक दिली. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर मृत कर्मचाऱ्याच्या नातेवाईकांनी टोल मॅनेजर अनिरुद्ध सिंगला मारहाण केली आणि मृतदेह असलेली रुग्णवाहिका टोलनाक्यावर उभी करत टोल कंपनीचा निषेध केला. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी ट्रकचालकाला अटक केली असून, घोटी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याच काम सुरु आहे. तर दुसरीकडे, योगेशच्या संतप्त नातेवाईकांनी टोल मॅनेजरला केलेल्या मारहाणीच्या निषेधार्थ टोल कर्मचाऱ्यांनी टोलनाका बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.