नाशिक : नाशिकमध्ये स्वाईन फ्ल्यूचा कहर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. जिल्ह्यात गेल्या 24 तासात स्वाईन फ्ल्यूसदृश आजाराने तिघांचा मृत्यू झालाय, तर आतापर्यंत 23 जणांचा बळी गेला.


शहरासह जिल्ह्यात गणेशोत्सवाची धूम सुरु असताना या गणेशोत्सवावर स्वाईन फ्ल्यूसह साथीच्या आजारांचे सावट आहे. हवामानात झालेल्या बदलामुळे गेल्या काही दिवसापासून स्वाईन फ्ल्यूच्या रुग्णांमध्ये वाढ होते आहे. जुलै महिन्यापासून आजार अधिक बळावला आहे.

गेल्या दीड-दोन महिन्यात जिल्ह्यात स्वाईन फ्ल्यूसदृश आजाराने 20 रुग्णांचा मृत्यू झालाय, तर 100 हून जास्त जणांना लागण झाली. सध्या जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या 18, तर जिल्ह्यातील इतर रुग्णलयांमध्ये 35 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

स्वाईन फ्ल्यूच्या औषधावरचे एफडीएचे निर्बंध हटवण्यात आल्याने मेडिकल स्टोअर्समध्ये औषधसाठा उपलब्ध झाला असून, जिल्हा रुग्णलयात 40 हजाराहून अधिक टॅमी फ्ल्यूच्या गोळ्या उपलब्ध झाल्या आहेत. ग्रामीण रुग्णालयातही या गोळ्यांचा पुरवठा केला जातोय.

नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे, सर्दी-खोकला, घशात खवखव सुरु झाल्यास डॉक्टरचा सल्ला घेण्याचं आवाहन जिल्हा रुग्णालयाकडून करण्यात आलाय, तर खासगी डॉक्टरांनी संशयित रुग्ण दाखल झाल्यावर इतर उपचाराप्रमाणे स्वाईन फ्ल्यू प्रतिबंधित औषधांचा मारा सुरु करण्याच्या सूचना देण्यात आल्यात.

मागील 15 दिवसात नाशिकच्या जिल्हा रुग्णलयाला आरोग्य मंत्री, आरोग्य संचालक यांनी भेट देऊन स्वाईन फ्ल्यू परिस्थितीचा आढावा घेतला होता. यंत्रणेला सूचना केल्या होत्या. मात्र त्याचा अद्याप काही उपयोग झाला नसल्याचं आकडेवारीवरुन निष्पन्न होत असल्याने, आता नागरिकांनीच अधिक सजग राहण्याची गरज असल्याचे दिसत आहे.