नाशिक : पांगुळगाड्याचा आधार घेत लहान मुलांना चालताना आपण अनेकदा पाहिले आहे. मात्र नाशिकमधील कुत्र्याच्या पिल्लासाठी खास पांगुलगाडा तयार करण्यात आला आहे. तरुणांनी कुत्र्यासाठीचा खास पांगुळगाडा तयार करुन, कुत्र्याच्या जखमी पिल्लाला जीवनदान दिलं आहे.

पंधरा दिवसांपूर्वी मेरी म्हसरुळ रस्त्यावर एका भरधाव वाहनाच्या टायरखाली येऊन चिंटू नावाचं हे कुत्र्याचं पिल्लू चिरडलं गेलं. या अपघातात कुत्र्याचे मागचे दोन्ही पाय निकामी झाले. या परिसरात राहणाऱ्यांनी कुत्र्याला तातडीने जखमी अवस्थेतील मंगलरुप गोशाळेत नेले आणि त्याच्या पायाचे एक्सरे काढले. दोन्ही पायांचे हाड मोडल्याचे निदर्शनास आले. कुत्रा मागच्या पायावर चालू शकणार नाही, असे डॉक्टरांनी सांगितले.

पांगुळगाडा तयार करण्यासाठी नाशिकमधील तरुण इंटरनेटच्या माध्यमातून एकत्र येत, लहान मुलांच्या सायकलची मागील दोन चाकं, प्लास्टिकच्या पाईपचे तुकडे असे साहित्य गोळा केले. दोन-तीन दिवसाच्या मेहनतीनंतर पांगुळगाडा तयार झाला. मात्र त्याचा उपयोग होईल की नाही ही धाकधूक कायम होती. अखेर तरुणांची मेहनत वाया गेली नाही आणि छोट्या चिंटूने मॉर्निंग इव्हिनिंग वॉक सुरु केला आणि सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहू लागला.

जसेजसे हे पिल्लू मोठे होईल, तसतसे त्याच्या पायात ताकद येईल आणि त्याचे चालणे अधिक सहज होईल. मात्र त्यासाठी थोडा वेळ देण्याची गरज आहे. या गोशाळेत सर्वच पशु-पक्षांवर उपचार केले जातात.

ज्यावेळी माणूस माणसाला परका होतंय, असे एकीकडे चित्र असताना, नाशिकमधील तरुण जखमी अपंग प्राण्यांची सुश्रुषा करत आहेत, हे अत्यंत दिलासादायक चित्र आहे.