भुजबळांच्या समर्थनार्थ मोर्चाला सत्ताकाळातील समर्थकांची पाठ?
एबीपी माझा वेब टीम | 02 Oct 2016 05:59 PM (IST)
नाशिक : राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्या समर्थनार्थ उद्या नाशिकमध्ये मूक मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. पण या मोर्चाला सत्ताकाळातील त्यांच्या समर्थकांनी पाठ फिरवल्याचा आरोप आयोजकांनी केला आहे. छगन भुजबळ यांची तब्येत सध्या बिघडलेली आहे. त्यातच राजकीय नेत्यांनी भुजबळांच्या भेटीचं सत्र सुरु केलं आहे. तसंच भुजबळांच्या समर्थनार्थ उद्या नाशिकमध्ये मोर्चाही आयोजित करण्यात आला आहे. शासनाने सुडबुद्धीतून भुजबळांवर कारवाई केल्याचा दावा समर्थकांनी केला आहे. छगन भुजबळ यांच्या समर्थनार्थ काढण्यात येणारा मोर्चा कुठल्याही जाती-धर्मा विरुद्ध नसून केवळ भुजबळ समर्थकांचा विराट मोर्चा राहणार असल्याचं समर्थकांच्या बैठकीत जाहीर करण्यात आलं. सत्तेच्या काळात चिकटलेले अनेक जण अडचणीच्या काळात सोडून गेलेय याची खंत स्वत: छगन भुजबळांनाही आहे, असंही त्यांच्या समर्थकांकडून सांगण्यात आलं आहे.