मुंबई : आम्ही लोकांचा, विरोधकांचा आवाज एकतो. राजीनामा घेण्याची गरज नव्हती कारण अजून तपास सुरु आहे. संजय राठोड जूना कार्यकर्ता आहे. विरोधी पक्षाचा जय झाला असे अजिबात समजू नये. जिथे जिथे भाजपचे सरकार आहे तिथेही असे प्रकार घडले. त्या मुलीची आत्महत्या की हत्या हे दुर्दैव आहे, अशी भूमिका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नाशिक येथील मुलाखतीत मांडली. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी वनमंत्री संजय राठोड यांनी अखेर राजीनामा दिला आहे. त्यावर ते बोलत होते.


राऊत म्हणाले, की याच काळात मुंबईत देलकरानी आत्महत्या केली. त्यांनी गुजरातला पण केली असती पण त्यांना वाटल असेल की तिथे न्याय मिळणार नाही. म्हणून मुंबईत केली असावी. देलकर यांनी आत्महत्या केली. त्या सुसाईड नोटमध्ये भाजप संबंधित नेत्यांची नावे असून आम्ही त्यांना न्याय देऊ, असेही राऊत म्हणाले. महाविकास आघाडीतील तीनही पक्ष कायम स्वरूपी राहणार आहे. एकही आमदार जाणार नाही आणि हे सगळ्यांना माहित असल्याचे राऊत म्हणाले.


राजभवनाचे अधःपतन सुरुय : संजय राऊत
राजभवनाचे अधःपतन सुरु असून हे सगळे दिल्लीचे एजंट असतात, त्या पदावर असणाऱ्यांना त्याची किंमत कळायला हवी. राज्यपाल कोश्यारी संघाचे प्रचारक होते, मंत्री होते, खासदार होते, ते वडीलधारी आहेत. कोश्यारी आजोबांसारखे बसलेले असतात. त्यांच्या विचारांच सरकार हवे म्हणून पहाटे त्यांनी शपथ दिली. राजपथची धडपड आहे की त्यांच्या विचारांच सरकांर यावं. पण, या देशाला राज्यपालाची नाही राष्ट्रपताची गरज आहे, पांढऱ्या हत्तीची गरज नसल्याचा टोलाही राऊत यांनी राज्यपालांना लगावला. लोकशाही मार्गाने आलेल्या सरकारसोबत ते असहकार करतायेत, असं असेल तर राज्यपाल पदाची गरज काय? 12 आमदारांची यादी राज्यपाल खाली घेऊन बसलेत, असेही ते म्हणाले.


भाजपकडून राज्यात गलिच्छ राजकारण : मुख्यमंत्री


मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, की न्यायाने वागणं ही आमची जबाबदारी आहे. दोषी कितीही मोठा असला तरी त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे हीच या सरकारची भूमिका आहे. मात्र, सध्या गलिच्छ राजकारण सुरु आहे. एखाद्याला आयुष्यातून उठवायचंच आहे म्हणून काम केलं जातंय. आम्ही म्हणतो तसाच तपास झाला पाहिजे असं म्हटलं जातंय. मात्र, तसं होणार नाही. संजय राठोड यांनी स्वतः राजीनामा दिल्याची माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली. ते पुढे म्हणाले की तुम्ही सोबत असाल तर प्रश्न सुटल्याशिवाय राहणार नाही. नुसते आरोप करणं म्हणजे बोलाची कढी आणि बोलाचा भात असल्याचे ते म्हणाले.