नाशिक : सत्ता भाजपच्या मालकीची आहे, आम्ही नुसते नावाला सत्तेत आहोत, असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले. शिवाय, भाजप काँग्रेस-राष्ट्रवादीऐवजी शिवसेनेलाच टार्गेट करते. त्यामुळे भाजप हा आमचा मुख्य विरोधी पक्ष असल्याचेही ते म्हणाले.


राज्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या अफवा ऐकतोय. खरंच होऊ द्या, मग बघू, असे म्हणत संजय राऊत पुढे म्हणाले, "लोकसभा विधानसभा निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. युती होवो किंवा न होवो, आम्ही तयारीत आहोत."

संघटनात्मक बैठकींसाठी नाशिकमध्ये आलेल्या संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना भाजपावर टीका केली. शिवसेना भाजपचे संबंध विकोपाला गेलेले असताना मुख्यमंत्री आणि पवारांची खासगी भेट झाल्यावर प्रतिक्रिया देताना राऊतांनी, शरद पवारांसारखा जेष्ठ नेता 'बालीश'पणाचं राजकारण करेल असं वाटत नाही, असा टोला लगावला.

"फेरीवाल्यांचा प्रश्न देशव्यापी आहे. शिवसेना योग्य वेळी बोलेल. देशात सर्वप्रथम फेरीवाल्यांच्या संदर्भातला आवाज बाळासाहेब ठाकरेंनीच उठवला होता. आताही जोपर्यंत मुख्यमंत्री पोलीसांचं संरक्षण देत नाही, तोपर्यंत महापालिका अतिक्रमण काढू शकत नाही.", असे सांगत संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांसह मनसेवर निशाणा साधला.

"गो. रा. खैरनार शिवसेनेने सर्वांसमोर आणले.  शिवसेनेने गो. रा. खैरनारांना पाठिंबा दिल्यानेच मुंबईनं मोकळा श्वास घेतला होता.", असे सांगायलाही राऊत विसरले नाहीत.