नाशिक : मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव दिले पाहिजे ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका होती, असे वक्तव्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. ते नाशिक येथील कार्यक्रमात बोलत होते. दरम्यान, औरंगाबाद नामांतराच्या मुद्द्यावरुन महाविकास आघाडी सरकारवर फडणवीस यांनी टीका केली आहे.


मराठवाडा विद्यापीठ नामांतरासाठी भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन आणि गोपिनाथ मुंडे यांनी कारावास भोगला असल्याचेही फडणवीस म्हणाले. मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव द्यावं ही संघाची भूमिका होती. आरएसएस विषयी अपप्रचार केला जात होता. संघाची भूमिका नानांनी मांडली. इंदिरा गांधी सरकार असताना अनेकांना तुरंगात टाकले. पण संघ विचाराने प्रेरित झालेलं कार्यकर्ते खचले नाहीत. संघाचे कार्य व्यक्ती निर्माणाचे कार्य नाना नवले यांनी केले. माणूस ओळखण्याचा हातोटा नानांमध्ये आहे. आपल्या संपूर्ण जीवनात इतरांना देण्याचं काम नाना नवले यांनी केलं, असल्याचंही फडणवीस यांनी सांगितले.


औरंगाबाद नामांतर प्रश्नी सरकारची भूमिका दुटप्पी : फडणवीस


औरंगाबाद नामांतर प्रश्नी सरकारची भूमिका दुटप्पी असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. ट्विटर वर संभाजीनगर उल्लेख करायचा आणि जे अधिकारात आहे ते नामांतर करायचे नाही. जे पक्ष सोडून गेले त्यांच्याविषयी काही फरक पडणार नाही. सत्ता असते तिथे लोक जात असतात, असंही फडणवीसांनी म्हटलं आहे.


धर्मनिरपेक्षतेच्या व्याख्येत औरंगजेब बसत नाही : मुख्यमंत्री
औरंगाबाद महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर औरंगाबाद शहराचं नामांतर करण्याच्या हालचाली ठाकरे सरकारकडून सुरु झाल्या आहेत. यातच सीएमओ म्हणजे मुख्यमंत्री कार्यालयाच्या ऑफिशियल ट्विटर हॅन्डलवरुन करण्यात आलेल्या ट्विटमध्ये औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर असा करण्यात आला होता. त्यानंतर काँग्रेसनं विरोध दर्शवला होता. मात्र यानंतर पुन्हा एकदा सीएमओच्या ट्विटर हॅन्डलवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादचा नामोल्लेख संभाजीनगर असा केला गेला. यावर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावर भाष्य केलं आहे. औरंगाबादच्या संभाजीनगर नामकरणाविषयी त्यांनी विचारलं असता ते म्हणाले की, 'त्याच्यात नवीन काय केलं मी.. जे वर्षानुवर्ष बोलत आलो आहे तेच केलं आहे आणि तेच स्वीकारणार' यावेळी त्यांना काँग्रेसकडून जाहीर करण्यात आलेल्या नाराजीबद्दलही विचारण्यात आलं. त्यावर ते म्हणाले की, औरंगजेब काही धर्मनिरपेक्ष नव्हता. त्यामुळे आमच्या अजेंड्यात धर्मनिरपेक्ष हा जो शब्द आहे त्याच्यात औरंगजेब बसत नाही, असं मुख्यमंत्री म्हणाले.