नाशिक : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा ड्रीम प्रोजेक्ट 'गोदापार्कला' गोदावरीच्या पुराची झळ बसली आहे. आधीच मुहुर्ताच्या प्रतिक्षेत असलेल्या गोदापार्कच्या लोकार्पण सोहळा पावसाच्या फटक्यानं वाहून गेल्याचं बोललं जातंय.

 

नाशिकमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरीला आलेल्या पुरात गोदापार्कची दैना झाली. विद्युत पोलसह गोदापार्कचा काही भाग पुरामुळे खचून गेला आहे. काही ठिकाणची हिरवळ अर्थात लॉन्सही वाहून गेले आहे. संरक्षक भिंतीची आणि सुरु असलेल्या कामांची पडझड झाली आहे. पुरामुळे या पार्कमधील पायऱ्यांच्या फरशां वाहून गेल्या आहेत, तर काही ठिकाणी बांधकामाला तडेही गेले आहेत.

 

50 कोटी पाण्यात

रिलायन्स फऊंडेशन मार्फत 50 कोटी खर्चुन बांधला जात असलेल्या या 500 मीटर अंतराच्या पार्कचे उद्घाटन करण्याची तयारी मनसेनं सुरु केली होती. यासाठी 15 ते 17 जुलै दरम्यान राज ठाकरे नाशिकचा दौराही करणार होते. पण पुरामुळं राज यांनी आपला दौराच रद्द केला. त्यामुळे पुराच्या पाण्यात गोदापार्कच नाही, तर त्याचा बहुप्रतिक्षेत लोकार्पण सोहळाही वाहून गेला असल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगली आहे.

गोदापार्कची विस्मृती

शिवसेनेत असतानापासून गोदापार्क हा राज ठाकरेंच्या स्वप्नातला प्रकल्प. 2002 साली आधी राज आणि उध्दव यांच्या उपस्थितीत आणि नंतरही अनेकदा लहान मोठे श्रीगणेशाचे कार्यक्रमं करुन गोदापार्क होणार होणार अशी हाकाटी पिटली होती. पण प्रकल्प काही पुर्णत्वास येऊ शकलेला नाही. कधी भुसंपादन तर कधी निधीची कमतरता अशा अडचणीच्या फेऱ्यात गोदापार्क अडकून राहिला. नंतर राज यांनीच शिवसेना सोडल्यानं गोदापार्क विस्मृतीत गेला होता.

उद्घाटनाआधीच डागडुजीची वेळ

पण 2012साली मनसेनं नाशिक महापालिकेत मनसेची सत्ता आल्यानंतर राज यांनी 2012नंतर आसाराम बापू पुल ते रामवाडीपर्यंतचा 9 किलोमीटर अंतराच्या गोदापार्कसाठी पुन्हा प्रयत्न सुरु केले. उद्योगांच्या सीएसआरमधून निधी मिळवण्यात यश आल्यानं गोदापार्कनं गती घेतली होती. मात्र, पावसानं त्यावर पाणी फेरलं. उद्घाटनाआधीच डागडुजी करण्याची वेळ महापालिकेवर आली आहे.