नाशिक : नाशिकमधल्या टाकळीरोडजवळ झालेल्या भीषण अपघातात पोलीस उपनिरिक्षकाचा मृत्यु झाला. रमेश साळी असं मृत पीएसआयचं नाव आहे. शनिवारी दुपारी दुचाकींच्या झालेल्या भीषण अपघातात साळी यांचं शरीर छिन्नविछिन्न झालं होतं.


हवालदार म्हणुन कारकिर्दीला सुरुवात केलेल्या साळी यांनी नाशिक शहर, कळवण येथे सेवा केली होती. सध्या सिन्नर पोलीस ठाण्यात उपनिरिक्षक म्हणून ते कार्यरत होते. मात्र 19 जुलैपासून ते वैद्यकीय कारणांस्तव रजेवर होते अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

अपघातानंतर बघ्यांपैकी काहींनी प्रसंगावधान राखत झाडाची फांदी आणून साळी यांच्या मृतदेहावर टाकली. रस्त्याच्या मधोमध छिन्नविछिन्न अवस्थेतला साळी यांचा मृतदेह पडलेला असल्यानं नारायण बापू नगर ते टाकळीरोड काहीकाळ वाहतूकीसाठी बंद करावा लागला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात आणला.

दरम्यान, काहीशा निर्जन रस्त्यावर झालेल्या या घटनेनं हा अपघात की घातपात याबद्दल संशय व्यक्त केला गेला आहे. हा दोन दुचाकींचा अपघात असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला असून अज्ञात वाहनाचा शोध सुरु करण्यात आला आहे.