मनमाड रेल्वे स्टेशनवर झोपलेल्या भिकाऱ्याला पोलिसांची बेदम मारहाण
एबीपी माझा वेब टीम | 12 Jan 2017 06:57 PM (IST)
नाशिक : नाशिक जिल्ह्यातील मनमाडमध्ये रेल्वे स्टेशनवर एका भिकाऱ्याला बेदम मारहाण करण्यात आली. मनमाड रेल्वे स्टेशनजवळ झोपलेल्या भिकाऱ्याला तिथे झोपल्याच्या कारणावरुन मारहाण करण्यात आली. तसंच त्याला वाईट शिव्याही घालण्यात आल्या. रेल्वे पोलीस जयकुमार तायडेंनी ही मारहाण केली आहे. मनमाड रेल्वे स्टेशनमध्ये हा भिकारी झोपला होता. रात्री उशिरा त्याठिकाणी दाखल झालेल्या पोलिसांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. पोलीस एवढ्यावरच थांबले नाहीत. त्यांनी हातातील रॉडनं भिकाऱ्याला बेदम मारलं. हा सर्व प्रकार घडत असताना तिथे बघ्यांची गर्दीही जमली. मात्र पोलिसांना थांबवण्याची तसदी कुणीही घेतली नाही. मनमाडमध्ये मारहाण झालेला भिकारी हा अपंग होता. त्यामुळे अपंग भिकाऱ्याला पोलिसांकडून झालेल्या मारहाणीबद्दल सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.