नाशिक : कसारा घाटात रेल्वे मार्गावर दरड कोसळल्याने हजारो प्रवासी मध्यरात्रीपासून इगतपुरी रेल्वे स्थानकावर 15-20 तासांपासून अडकून पडलेत. दरड कोसळल्याचे वेळीच लक्षात आल्याने मोठा अनर्थ टळला आहे. मात्र लहान मुलांनाही याठिकाणी उपाशीपोटी थांबावं लातल्याने प्रवाशांनी चांगलाच मनस्ताप सहन करावा लागत आहे. 


इगतपुरी ते कसारा मार्गावर ठीकठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना घडल्याने रेल्वे इगतपुरी  स्थानकावर थांबवण्यात आल्या आहेत. तेव्हापासून प्रवाशांचा लहान मुलांसह प्लॅटफॉर्मवरच मुक्काम आहे. एकीकडे रात्रभर मुसळधार पाऊस तर दुसरीकडे प्रशासनाकडून  कुठल्याही स्पष्ट सूचना नाही. खाण्यापिण्याची कोणतीही सोय नसल्याने प्रवाशांना उपाशी पोटीच थांबावं लागलं. 


नाशिकमार्गे मुंबईला जाणारी पंचवटी, राज्यराणी एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे चाकरमान्याचे हाल झाले आहेत. तर काही गाड्या मनमाडमार्गे वळवण्यात आल्या आहेत. ज्या गाड्या इगतपुरी नाशिकसह इतर स्थानकावर थांबवण्यात आल्यात त्या प्रवाशांना रस्ते मार्गाने इच्छित स्थळी पोहोचवण्यात आले. त्यामुळे अचानक आलेल्या या संकटाने यंत्रणेची त्रेधातिरपीट तर उडालीच. मात्र प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. 


रेल्वे प्रशासनाने युद्धपातळीवर दरड हटवण्य़ाचे काम सुरु केले. त्यामुळे डाऊन मार्गावरील एक लाईन सुरू करण्यात आली आहे. या लाईनहून  पंजाब मेल एक्सप्रेस आणि त्यानंतर मुंबई-नागपूर दुरांतो एक्सप्रेस नाशिकच्या दिशेने रवाना करण्यात आली आहे. अप मार्गावरील वाहतूक अजूनही बंद असून या मार्गावर काम सुरू आहे. 


रेल्वे प्रवाशांच्या मदतीला एसटी धावली


मुसळधार पावसामुळे कसारा घाटात दरड कोसळल्याने मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे कामानिमित्त मुंबईत येणाऱ्या व नाशिकला जाणाऱ्या प्रवाशांच्या मदतीला एसटी धावून आली. कसारा, इगतपूरी येथे अडकलेल्या प्रवाशांसाठी एसटी महामंडळाने गुरुवारी पहाटे 4 वाजता तातडीने 133 बसेस सोडल्या. या बसेसमधून सुमारे 5800 प्रवाशांना सुखरूप सोडले, अशी माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली.