नाशिक : अवकाळी पावसामुळे नाशिकमध्ये पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं असून सरकारकडून मदत कधी मिळणार याकडे बळीराजाचं लक्ष लागल आहे. मात्र दुसरीकडे पंचनामा करताना कृषी अधिकाऱ्यांकडून प्रत्यक्ष नुकसानीपेक्षा कमी नुकसान दाखवले जात असल्याचा गंभीर प्रकार नाशिकमध्ये समोर आला असून यामुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.


गेल्या आठवड्यात अवकाळी पावसाने नाशिक जिल्ह्याला अक्षरशः झोडपून काढलं आहे. यामध्ये द्राक्ष, कांदा, मका, सोयाबीनसह अनेक पिकांचं 100 टक्के नुकसान झालं असून बळीराजासमोर मोठ संकट कोसळल आहे. सरकारकडून काहीतरी मदत मिळेल याकडे ते डोळा लावून बसलेले असतांनाच कृषी आधिकारी पंचनामा करतांना प्रत्यक्ष नुकसानीपेक्षा कमी नुकसानीची नोंद करत आहे. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या सूचनांनाही ते गांभीर्याने घेत नसल्याचं दिसून येत आहे. पंचनामे नीट होत नसल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून अनेक वेळा केला जातो. नाशिकमध्ये भाजपच्याच खासदार भारती पवार यांच्या पाहणी दौऱ्यादरम्यान ही बाब उघडकीस आली असून शेतकऱ्यांसमोरच त्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरलं आहे.

पंचनामे नीट होत नसल्याचं आरोप नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांनी फेटाळून लावला आहे. यंदा पावसामुळे झालेलं नुकसान हे अभूतपूर्व असून 5 लाख शेतकऱ्यांची जवळपास 4 लाख हेक्टर शेती पावसामुळे बाधित झाली आहे. लवकरात लवकर त्यांचे पंचनामे पूर्ण व्हावेत म्हणून अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या दिवाळीच्या सुट्ट्या रद्द करून काम केली जात असून ते प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन काम करत नसतील तर त्यांना जीओ टॅगिंगही अनिवार्य करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे शेतकऱ्यांना काही अडचणी असल्यास जिल्हाधिकारी कार्यालयाकडून व्हॉट्सअॅप क्रमांकही जारी करण्यात आला असून आत्तापर्यंत व्हॉट्स अॅपवर आलेल्या 28 तक्रारींचं निराकरण करण्यात आल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे. कोणाची काही तक्रार असल्यास त्यांनी संपर्क साधण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे.