Nashik: नाशिक मुंबई रस्ता 6 नोव्हेंबरपर्यंत संपूर्णपणे खड्डेमुक्त करण्यात येईल. तो पर्यंत आंदोलन करू नये, अशी विनंती नॅशनल हायवे प्राधिकरणचे प्रकल्प संचालक साळुंखे यांनी छगन भुजबळ यांच्याकडे केली आहे. त्यानुसार छगन भुजबळ यांची ही विनंती मान्य करत उद्या आंदोलन न करण्याचा निर्णय घेतला असून 6 नोव्हेंबरपर्यंत अधिकाऱ्यांना वेळ वाढवून दिला आहे.


राज्याचे माजी मंत्री छगन भुजबळ यांनी गेल्या आठवड्यात नॅशनल हायवे प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांसमवेत नाशिक ते पडघा दरम्यान रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी केली होती. पाहणी झाल्यानंतर 31 ऑक्टोबरपर्यंत रस्त्याची दुरुस्ती करा अन्यथा 1 नोव्हेंबर पासून टोल बंद आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. तेव्हापासून माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या कार्यालयाकडून सातत्याने रस्त्याच्या कामाबाबत पाठपुरावा सुरु होता. तसेच दैनदिन झालेल्या कामाचा आढावा घेण्यात येत होता. तसेच आज पदाधिकाऱ्यांनी स्वतः या रस्त्याची पाहणी केली. त्यानंतर आज पुन्हा भुजबळ फार्म येथील अधिकाऱ्यांसमवेत कामाचा आढावा घेतला.


या बैठकीत छगन भुजबळ यांनी उपस्थित अधिकारी, कंत्राटदार कंपनीचे अधिकारी यांच्याकडून कामाच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला. यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी देखील आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी नॅशनल हायवे प्राधिकरणचे प्रकल्प संचालक साळुंखे यांनी गेल्या आठवड्यात पाहणीनंतर कामास सुरुवात करण्यात आली. परंतु पुन्हा पाऊस आणि दिवाळीच्या सुट्टीमुळे कामगार नसल्याने तसेच डांबर प्रकल्प बंद असल्याने काम करता आले नाही. दिवाळी नंतर पुन्हा काम सुरु करण्यात आलेले आहे. त्यामुळे आम्हाला अजून पाच ते सहा दिवसांचा वेळ मिळावा. त्यानुसार 6 नोव्हेंबरपर्यंत मुंबई नाशिक रस्ता पूर्ण खड्डेमुक्त करू, असे आश्वासन त्यांनी बैठकीत दिले. तसेच आंदोलन मागे घ्यावे अशी विनंती त्यांनी छगन भुजबळ यांच्याकडे केली.


बैठकीनंतर छगन भुजबळ यांनी अधिकाऱ्यांसमवेत पत्रकारांशी संवाद साधत आपली भूमिका स्पष्ट केली. अधिकाऱ्यांनी दिलेली माहिती तसेच प्रत्यक्ष पदाधिकाऱ्यांमार्फत करण्यात आलेल्या पाहणी नुसार अधिक वेळ अधिकाऱ्यांना काम करण्यासाठी देण्यात येत आहे. त्यानुसार नाशिक मुंबई रस्ता 6 नोव्हेंबरपर्यंत खड्डेमुक्त करण्यासाठी अधिकाऱ्यांना वेळ वाढवून देण्यात येत आहे. अधिकाऱ्यांनी मागितलेल्या वेळत काम न झाल्यास आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यात येईल अशी भूमिका त्यांनी यावेळी स्पष्ट केली. 


टोल नाक्यावरील अनुचित प्रकार रोखा


टोल नाक्यांवर वसुली करत असतांना टोलवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून नागरिकांना अरेरावी करण्यात येत आहे. यातून अनेक वाद होत आहे. वारंवार होत असलेल्या या अनुचित प्रकारांना तातडीने आळा घालण्यात येऊन सबंधित कर्मचाऱ्यांना याबाबत सूचना देण्यात याव्यात असे छगन भुजबळ यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. यावेळी कुठलाही अनुचित प्रकार यापुढे होणार नाही याबाबत आवश्यक ती कार्यवाही करू असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले.


त्वरित गाड्या सोडण्याच्या सूचना


टोल नाक्यावर टोल वसुली करतांना वाहनांच्या रांगा लागत असून नागरिकांना अनेक वेळ ताटकळत रहावे लागत आहे. याबाबत नागरिकांच्या तक्रारी प्राप्त होत आहे. यासाठी अधिकाऱ्यांनी यावर तातडीने कार्यवाही करत टोल चालकांना सूचना कराव्यात. तसेच पाच मिनिटांहून अधिक वेळ वाहनांच्या रांगा लागल्यास तात्काळ वाहने सोडण्यात यावी अशा सूचना छगन भुजबळ यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. यावर टोल चालकांना याबाबत पत्रक काढून सूचना देण्यात येतील अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.