नाशिक : नाशिकच्या पंचवटी भागात दीरानेच वहिनीची गळा आवळून हत्या करुन पंख्याला गळफास लावून आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे भावाच्या वाढदिवशीच हा प्रकार घडला.


नाशिकमध्ये दिंडोरी रोडच्या लक्ष्मी रेसिडन्सी अपार्टमेंटमध्ये विकास शर्मा पत्नी आणि भावासोबत राहत होते. विकास शर्मा हे एका खासगी कंपनीत सेल्स मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत. ते बऱ्याचदा कामानिमित्त बाहेरगावी असतात.

गुरुवारी विकास यांचा वाढदिवस असल्याने ते मध्यरात्री एकच्या सुमारास घरी आले. मात्र अनेकदा बेल वाजवूनही दरवाजा न उघडल्यानं शेजाऱ्यांच्या मदतीनं विकास यांनी दरवाजा तोडला.

प्रवेश करताच त्यांना हॉलमध्ये केक, चॉकलेट्स, फुगे दिसून आले. मात्र बेडरुममध्ये पाऊल ठेवताच भाऊ श्रीराम
शर्माचा मृतदेह फॅनला गळफास घेतलेल्या अवस्थेत, तर पत्नी प्रिया शर्माचा मृतदेह जमिनीवर पडलेला आढळला.

पंचवटी पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करुन मयत दीर श्रीरामकुमार शर्मा यांच्यावर हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. महिलेच्या गळ्यावर दोरीनं आवळल्याच्या खुणा दिसत असल्याने गळा आवळून हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.