या टोळीने लाखो रुपयांचे दागिने काही सेकंदात लंपास केले आहेत. नाशिक रोडवरच्या बाफना ज्वेलर्समध्ये झालेला हा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. एका लहान मुलीसोबत दोन महिला बाफना ज्वेलर्समध्ये आल्या होत्या. दोन्ही महिलांनी आधी सोन्याच्या बांगड्या बघायला मागितल्या. त्यानंतर बांगड्या नको, हार दाखवा असं सांगत विक्रेत्याला बोलण्यात गुंतवून ठेवलं. त्याचवेळी एका महिलेनं बांगड्याचा सेट उचलून लहान मुलीकडे दिला.
त्या मुलीनं मोठ्या चलाखीनं बांगड्यांचा सेट आपल्या कपड्यांमध्ये लपवला. मात्र मुलीच्या हालचालींचा संशय आल्यानं दुकानातल्या एका महिलेनं याबाबत विचारणा केली. तेव्हा दागिने चोरणाऱ्या महिलांनीच हुज्जत घातली आणि तिथून पळ काढला. या महिला दुकानातून पसार झाल्यानंतर दुकानातील दागिन्याना एक सेट गायब असल्याचे मालकाच्या लक्षात आले. या महिलांनी चोरी केलेला सेट 85 ग्रॅमचा म्हणजे अंदाजे 3 लाख रुपये किमतीचा आहे.
बाफना ज्वेलर्सच्या मालकांनी चोरीचा प्रकार लक्षात येताच उपनगर पोलीस स्टेशन गाठलं. सीसीटीव्ही फुटेच्या आधारवर पोलीसांनी चोरीचा तपास सुरु केला आहे. या महिलांना अशा प्रकारे आणखी दोन ठिकाणी चोरी केल्याचं समोर आलं आहे.