नाशकात कुटुंबाकडे 25 तोळे सोन्याची चोरी, 48 तासात छडा
एबीपी माझा वेब टीम | 13 Jul 2016 02:58 PM (IST)
नाशिक : चोरीला गेलेलं सोनं किंवा मुद्देमाल परत मिळणं तसं कठीण, पण नाशिकचं सोनवणे कुटुंबीय मात्र नशिबवान ठरलं आहे. त्यांचं चोरीला गेलेलं 25 तोळे सोनं अवघ्या 48 तासात परत मिळालंय. जलसंपदा विभागात सहाय्यक अभियंता असलेल्या प्रकाश सोनवणे यांच्या घरी रविवारी चोरी झाली होती. चोरट्यांनी 25 तोळे सोनं आणि 2 लाख रुपये लांबवले. सोनवणे यांनी म्हसरुळ पोलिसांत गुन्हा नोंदवल्यानंतर पोलिसांनी बाळू प्रधान नावाच्या चोरट्याला ताब्यात घेतलं. आरोपीकडून चोरीला गेलेला ऐवज जप्त करण्यात आलंय. याप्रकरणी इतर दोन आरोपींचा सध्या पोलिस शोध घेतायत, त्यांच्याकडे उर्वरीत 5 तोळे सोनं आणि 2 लाखाची रोकड आहे.