नाशिक : 23 नोव्हेंबरपासून नववी ते 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी राज्यातील शाळा, कॉलेजेस प्रत्यक्षपणे सुरु करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. मात्र या निर्णयामुळे अनेक विद्यार्थ्यांचे जीव धोक्यात तर येणार नाही ना? असा प्रश्न आता उपस्थित होतं आहे.


नाशिक जिल्ह्यातील 1324 शाळा 100 टक्के सुरु करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. सर्व शिक्षकांना अँटीजन टेस्ट करणे अनिवार्य असून काही प्रमाणात लक्षणे असलेल्या शिक्षकांची आरटीपीसीआर तपासणी करण्यात यावी अशा सूचना जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिल्या आहेत. तसेच शाळांमध्ये पालकांच्या लेखी संमतीने 50 टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती राहणार असल्याने शाळांची स्वच्छता, नियमित सॅनिटायझेशन, सामाजिक अंतर या सर्व गोष्टींचं पालन करण्यात यावं, तसेच प्रतिबंधित क्षेत्रातील देखील शाळा सुरू होणार असल्याने या भागातही कोविडबाबतच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.


नाशिकमध्ये साडेआठ महिन्यानंतर शाळांची प्रवेशद्वार काल खुली करण्यात आली. साफसफाई तसेच सॅनिटायझेशनच्या कामालाही वेग आला आहे. 23 तारीख कधी उजाडेल याची विद्यार्थ्यासोबतच शिक्षक देखिल वाट बघताय, मात्र असे असले तरी नाशिक शहराच्या मेरी परिसरातील सिडीओ मेरी शाळेचे शिक्षक, विद्यार्थी आणि पालक सध्या चिंतेत आहेत. या शाळेच्या अगदी हाकेच्या अंतरावर महापालिकेचे कोरोना कोविड सेंटर आहे. सध्या या कोविड सेंटरमध्ये 25 हून अधिक रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच रोज शेकडो संशयित रुग्ण येथे कोरोनाची चाचणी करण्यासाठी दाखल होत असतात. यासोबतच शाळेच्या आवारातही संशयित रुग्णांचा वावर बघायला मिळतो. ही सर्व परिस्थिती बघता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आम्ही सर्व खबरदारी घेऊ असं जरी शाळा प्रशासन सांगितलं असलं तरी पालकांसोबतच शिक्षकांमध्ये भितीचं वातावरण आहे.


सिडीओ मेरी शाळेत नववी आणि दहावीचे मिळून एकूण 927 विद्यार्थी आहेत. त्यापैकी आतापर्यंत फक्त 10 टक्के विद्यार्थ्याच्या पालकांनी आपल्या पाल्यांना शाळेत पाठवण्याचं संमतीपत्र दिल असून सुरक्षेच्या कारणास्तव इतर पालक मुलांना शाळेत पाठवण्यास तयार नाही. कोविड सेंटरची जागा बदलल्याशिवाय मुलांना आम्ही शाळेत पाठवणार नाही अस उत्तर अनेक पालकांनी शाळा प्रशासनाला दिलं आहे. तर ज्या विद्यार्थ्यांसाठी शाळा सुरु करण्याचा निर्णय सरकारने घेतलाय ते विद्यार्थीही शाळेत जाण्यासाठी तयार नाहीत. एकीकडे कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता असताना, दुसरीकडे शाळा सुरु करण्याचा ठाकरे सरकारचा निर्णय योग्य नसल्याचं मत पालक व्यक्त करतायत.


खरं बघितलं तर दिवाळी होताच नाशिकमध्ये कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. रिकामे होत चाललेल्या कोविड सेंटरबाहेर पुन्हा रांगा लागल्याचं चित्र बघायला मिळतयं. सर्व परिस्थितीत शाळा सुरु झाल्यास किती पालक आपल्या विद्यार्थ्यांना शाळेत पाठवतील हे बघणं महत्वाचं ठरणार आहे. विशेष म्हणजे सीडीओ मेरी सारखी शाळा सुरु करून सरकार आणि स्थानिक प्रशासन विद्यार्थ्यांचे जीव धोक्यात तर घालत नाहीयेत ना ? हा प्रश्न आता उपस्थित होतोय.


गर्दीने लावली वाट, आता कोरोनाची दुसरी लाट? दिल्ली, अहमदाबाद, मध्य प्रदेशात निर्बंध वाढले