नाशिक : एक राजकीय महंत आणि एका सामाजिक संघटनेचा जिल्हाध्यक्ष कोट्यवधींच्या नोटाबदली प्रकरणी ताब्यात घेतल्याच्या माहितीमुळे नाशिकमध्ये खळबळ उडाली आहे. दोन बॅगांमध्ये कोट्यवधींची रक्कम सापडल्याची माहिती आहे.


नाशिकजवळ मुंबई-आग्रा महामार्गावर इंदिरानगर परिसरातील एका नामांकित हॉटेलमध्ये नोटाबदलीचा प्रकार सुरु असताना कारवाई झाली आहे. संबंधित राजकीय महंत, सामाजिक संघटनेचा जिल्हाध्यक्ष आणि एक उद्योगपती अशा तिघांना ताब्यात घेण्यात आलं आहे. संशयितांकडून मोबाईल, टॅब पोलिसांनी जप्त केले आहेत.

हॉटेलात नोटाबदली करण्यासाठी आलेल्या तिघांना आयकर विभागाने रविवारी रात्री चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. या तिघांकडून 2 बॅगा भरुन नोटा सापडल्याची चर्चा आहे. रविवार रात्री उशिरापर्यंत त्यांची चौकशी सुरु होती. जबाब लिहून घेतल्यानंतर संबंधितांना सोडून देण्यात आलं.

नोटा नेमक्या किती रुपयांच्या होत्या, हॉटेलमध्ये नेमका काय प्रकार सुरु होता, यामागे नोटाबदलीचं एखादं रॅकेट सक्रिय आहे का? असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहेत.