नाशिक : पोलिसांना चांगल्या कामगिरीबद्दल मिळालेलं बक्षिस आणि प्रशस्तीपत्राबद्दल तुम्ही ऐकलं असेल. मात्र नाशिक पोलीस दलातील चार कर्मचाऱ्यांना अजब बक्षिस देण्यात आलं आहे. या चार पोलीस कर्मचाऱ्यांना जीएसटी म्हणजे गुड सर्व्हिस तिकीट वजा करुन 100 रुपये बक्षिस आणि प्रशस्तीपत्र मिळालं आहे.

नाशिक परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक विनयकुमार चौबे यांच्या मुलीच्या आजारपणाच्या काळात या चार पोलीस कर्मचाऱ्यांनी चांगली सेवा बजावली. त्यामुळे चौबे यांनी त्यांचा सन्मान करण्याचं ठरवलं. मात्र जीएसटी वजा करुन चक्क 100 रुपयांचं बक्षिस देऊन पोलिसांच्या मेहनतीची एक प्रकारे थट्टा उडवण्यात आली आहे. जीएसटी अर्थात गुड सर्व्हिस तिकीट हे ब्रिटीश काळापासून दिलं जातं, पण ते वजा करत 100 रुपये बक्षिस देण्यात आलं.

पोलीस हवालदार संजय खराटे, आसीप उमर शेख, मारुती सटवा पांडलवाड आणि किरण देवराम नागरे अशी चार कर्मचाऱ्यांची नावं आहेत. दरम्यान, पोलीस अधिकाऱ्यांना याविषयी विचारलं असता ती प्रिंटिंग मिस्टेक असल्याचं सांगून हात झटकले आहेत. शिवाय रुग्णालयाच्या कामासाठी नाही, तर कार्यालयीन कामासाठी बक्षिस दिल्याचा दावा करण्यात आला आहे.