IPS Ankush Shinde Transfer : नाशिक पोलीस आयुक्त अंकुश शिंदे (IPS Ankush Shinde) यांची बदली करण्यात आली असून त्या ठिकाणी नवे पोलीस आयुक्त म्हणून संदीप कर्णिक (IPS Sandeep Karnik) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संदीप कर्णिक यापूर्वी पुण्याचे पोलीस सहआयुक्त होते. मावळते आयुक्त अंकुश शिंदे यांची राज्य गुप्त वार्ताच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली करण्यात आली आहे.


नाशिक शहरातील गुन्हेगारी आणि ड्रग्स प्रकरणी मुबंई, पुणे पोलिसांनी नाशिकमधे कारवाई केल्यानंतर नाशिक पोलिसांच्या कार्यक्षमतावर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. त्यानंतर आता पोलीस आयुक्तांची उचलबांगडी करण्यात आली आहे. त्या ठिकाणी पुण्याचे सहआयुक्त संदीप कर्णिक (IPS Sandeep Karnik To Be New Police Commissioner Of Nashik) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 


अंकुश शिंदे यांची दहा महिन्यातच बदली


अंकुश शिंदे यांच्याकडे नाशिकचे पोलीस आयुक्तायलाची जबाबदारी 13 डिसेंबर 2022 रोजी देण्यात आली होती. त्या आधीचे पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे यांची नऊ महिन्यातच बदली करण्यात आली होती. वाढत्या गुन्हेगारीवर आळा बसवण्यात ते अपयशी ठरत असल्याने त्यांची बदली करून त्या ठिकाणी अंकुश शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली होती. अंकुश शिंदे यांनी या आधी नाशिक ग्रामीणच्या पोलीस अधीक्षकपदाची जबाबदारी पार पाडल्यान ते नाशिकच्या गुन्हेगारीला आळा घालतील अशी अपेक्षा होती. 


नाशिकमधील वाढती गुन्हेगारी आणि ड्रग्ज प्रकरणी निर्बंध घालण्यात पोलिसांना आलेल्या अपयशानंतर आता अंकुश शिंदे यांची दहा महिन्यातच पुन्हा बदली करण्यात आली आहे. 


मावळ गोळीबार प्रकरणी संदीप कर्णिक चर्चेत 


नाशिकचे पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आलेल्या संदीप कर्णिक यांची पुण्यातील या आधीची कारकीर्द वादग्रस्त राहिली आहे. पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक असताना संदीप कर्णिक यांनी मावळमधील शेतकऱ्यांवर गोळीबार करण्याचे आदेश दिले होते आणि स्वतः देखील शेतकऱ्यांवर गोळीबार केला होता. 9 ऑगस्ट 2011 रोजी झालेल्या या गोळीबारात एका महिलेसह तीन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता तर 14 शेतकरी जखमी झाले होते.
  
पिंपरी-चिंचवड शहराला पुणे जिल्ह्यातील पवना धरणातून बंद पाईपलाईन मार्फत पाणी पुरवठा करण्यासाठी मावळ भागातील शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहित कराव्या लागणार होत्या. 9 ऑगस्ट 2011 रोजी या अधिग्रहणाचा विरोध करण्यासाठी शेतकऱ्यांचा मोठा जमाव अचानक पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर आला आणि त्यांनी एक्स्प्रेस वे रोखून धरला. त्यावेळी शेतकऱ्यांना पांगवण्यासाठी पोलिसांना हवेत गोळीबार करण्याचे आदेश दिले. मात्र त्यानंतर शेतकऱ्यांवर गोळीबार करण्याचे आदेश संदीप कर्णिक यांनी दिले होते. त्याचबरोबर स्वतःकडील बंदुकीतून त्यांनी शेतकऱ्यांवर गोळीबार केला होता.