नाशिक : नाशकातले आठ पोलिस अधिकारी एका लग्न सोहळ्यामुळे अडचणीत येण्याची शक्यता आहे. पोलिस अधिकाऱ्यांनी कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या नातेवाईकाच्या लग्नाला हजेरी लावली होती.
गेल्या आठवड्यात नाशिकमधल्या जग्गी कोकणी यांच्या धाकट्या मुलीचा विवाह शहरातले प्रसिद्ध धर्मगुरु खतीब यांच्या मुलाशी झाला. जग्गी कोकणी यांची मोठी मुलगी ही अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इकबाल कासकरची सून आहे. त्यामुळे दाऊदच्या नातेवाईकांचा विवाहसोहळा अशी या लग्नासंदर्भात चर्चा होती.
या लग्नाला पोलिस अधिकाऱ्यांसह नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन, भाजप आमदार आणि महापालिकेच्या उपमहापौरांनी उपस्थिती लावली. मात्र या लग्नाच्या दावतीला हजेरी लावणारे एक सहाय्यक पोलिस आयुक्त, 2 पोलिस निरीक्षक, 2 पोलिस उपनिरीक्षक आणि इतर पोलिस कर्मचाऱ्यांना आयुक्तांनी जाब विचारला.
खतीब हे नाशकातले प्रसिद्ध धर्मगुरु असून त्यांच्या निमंत्रणावरुनच लग्नाला हजेरी लावल्याचं संबंधित पोलिसांनी स्पष्ट केलं.