SMS न आल्याने टोळक्याची पेट्रोल पंप कर्मचाऱ्याला मारहाण
प्रांजल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक | 28 Mar 2018 04:23 PM (IST)
कार्ड स्वाईप केल्यानंतर पैसे भरले गेले, मात्र मोबाईलवर तसा एसएमएस न आल्यामुळे आरोपी श्रीकांतने सुधाकरला शिवीगाळ केली.
नाशिक : पेट्रोल पंपावर कार्ड स्वाईप केल्यानंतरही पैसे भरल्याचा एसएमएस न आल्याच्या रागातून एका टोळक्याने पेट्रोल पंपावर गोंधळ घातला. नाशकातील पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याला टोळक्याने मारहाण केल्याचा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. सुधाकर पटेकर हा कर्मचारी त्र्यंबक नाक्यावरील मेहता पेट्रोल पंपावर मंगळवारी रात्री काम करत होता. त्यावेळी श्रीकांत वाघ नावाच्या तरुणाने गाडीत पेट्रोल भरुन घेतलं. कार्ड स्वाईप केल्यानंतर पैसे भरले गेले, मात्र मोबाईलवर तसा एसएमएस न आल्यामुळे आरोपी श्रीकांतने सुधाकरला शिवीगाळ केली. यानंतर श्रीकांत निघून गेला. सुधाकर पटेकर रात्री पावणे बारा वाजताच्या सुमारास पेट्रोल पंपावरील ऑफिसच्या केबिनमध्ये बसून पैसे मोजत होता. त्यावेळी श्रीकांत वाघ आपल्या आठ साथीदारांसोबत पुन्हा तिथे आला आणि त्यांनी सुधाकरला लाथाबुक्क्यांनी तुफान मारहाण केली. त्याच्याजवळ असलेली 12 हजार 700 रुपयांची कॅशही त्यांनी लुटून नेली. मारहाणीत सुधाकर जखमी झाला असून त्याच्यावर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्याच्या तक्रारीनुसार भद्रकाली पोलिस ठाण्यात मारहाण आणि दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आठही आरोपींना सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे ताब्यात घेतलं असून यातील काही जण सराईत गुन्हेगार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.