Nashik News Update :  काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाचे सर्वांनाच वेध लागले आहेत. मात्र , यंदा नाशिकमध्ये पूर्णतः पीओपी गणेश मूर्त्यांवर बंदी घालण्यात आली आहे. पीओपी मूर्तीच्या विक्रीवर निर्बंध असले तरी अशा मूर्ती बाजारात विक्रिला असतातच. त्यामुळे मनपा प्रशासन पुन्हा एकदा कठोर पावले उचलत असून पीओपी मुर्त्या तयार करणाऱ्या विक्रेत्यांना नोटिसा देण्यात आल्या आहेत.


नदीप्रदूषण टाळण्यासाठी पीओपीपासून तयार केलेल्या गणेश मूर्तींचे कुठेही विर्सजन करता येणार नाही.  या नागपूर खंडपीठाच्या निर्णयानंतर नाशिक महापालिकेने देखील पीओपी मूर्तींबाबत कठोर निर्णय घेण्याची भूमिका घेतली आहे. मागील वर्षापासून नाशिकमध्ये पीओपी मूर्ती उत्पादन, विक्री आणि साठ्यावर बंदी घालण्यात आली आहे. 


दरम्यान, मागील वर्षापासून याबाबत जनजागृती करण्यात आली असली तरी यंदाही शहरातील काही भागांमध्ये पीओपीच्या गणेश मूर्ती तयार करण्यात येत असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे महापालिकेच्या विभागीय अधिकाऱ्यांनी अशा ठिकाणी जाऊन नोटीस देऊन कारवाई करण्याचे आदेश  दिले आहेत. याबाबत पंचवटी भागात एका विक्रेत्याला नोटीस देण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.


गणेशोत्सव जवळ आला की प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्ती हा मुद्दा चर्चेला येतोच. पीओपी पाण्यात विरघळत नाही. त्यामुळे ते पर्यावरणपूरक नसून जलस्रोतांसाठी धोकादायक आहे. हे वेळोवेळी सांगितले जाते. यंदा तर नाशिकमध्ये पीओपी मूर्ती उत्पादन, विक्री आणि साठ्यावर बंदी घालण्यात आली आहे.  तरीसुद्धा या मूर्ती बाजाराज येतातच आणि त्यांची खरेदीसुद्धा होतेच. मात्र यंदा असं होऊ नये यासाठी मनपा प्रशासन आतापासून सतर्क झाले आहे. 


शहरात पीओपी मूर्ती तयार करणाऱ्या मूर्तीकारांची तपासणी करण्यात येत आहे. यासाठी मनपाकडून जनजागृती केली जात असल्याची माहिती आहे. त्यामुळे गणेशोत्सवासाठी पीओपी मुर्त्या तयार करणाऱ्यांना चाप बसण्याची शक्यता आहे.


एसबीआयवर कारवाई
शहरातील एनडी पटेलरोडवरील स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या शाखेने पीओपीचे टाकाऊ साहित्य टाकल्याने नाशिक महापालिकेने 25 हजारांचा दंड ठोठावला आहे. तर झाडाच्या छाटणी केलेल्या झाडाच्या फांद्या रस्त्यांवर टाकल्याने महावितरणकडून देखील पाच हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.