नाशिक : नाशिकच्या द्वारका परिसरातील विवाहितेच्या संशयास्पद मृत्यूमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. श्याम अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या सोनल वाकोडे यांचा मृतदेह शनिवारी रात्री अपार्टमेंटच्या खाली रस्त्यावर आढळून आला.

सासरच्या मंडळींकडून वेळोवेळी पैशाची मागणी केली जाऊन तिचा छळ केला जात होता, अशी तक्रार सोनलच्या वडिलांनी पोलिसात दिली आहे. या फिर्यादीनुसार पती गजानन वाकोडे, गजाननची पहिली पत्नी (सवत) गंगा वाकोडे यासोबतच सासू, सासरे आणि दीर अशा 5 जणांविरोधात उपनगर पोलिस स्टेशनला हुंडाबळीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

परभणीत शेती व्यवसाय करणाऱ्या त्र्यंबक कांबळे या गरीब शेतकऱ्याने आपली मुलगी सोनलचा विवाह गजाननशी तीन वर्षांपूर्वी लावून दिला. तेव्हापासूनच सोनलचा सासरच्यांकडून वेळोवेळी छळ होऊन तिच्याकडून पैशांची मागणी केली जात असल्याचा आरोप माहेरच्यांनी केला आहे.

विशेष म्हणजे गजाननचं याआधीही एक लग्न झालं असल्याचं सोनल किंवा तिच्या माहेरच्यांना सांगण्यात आलं नव्हतं. त्याची पहिली पत्नी गंगा आणि सासरच्या मंडळींकडून तिला नेहमी मारहाण होत असे, तसंच तिला 5-6 दिवस जेवायला दिलं जात नव्हतं, त्यामुळे त्यांनीच तिला मारहाण करून बिल्डिंगवरुन ढकलून देऊन मारुन टाकल्याचा आरोप सोनलच्या वडिलांनी केला आहे.

आरोपींना जन्मठेप देण्यात यावी, त्यामुळे इतर कोणी मुलींचा अशाप्रकारे छळ करणार नाही, अशी भावना सोनलच्या नातेवाईकांनी व्यक्त केली आहे.