नाशिकमध्ये पतंगाच्या मांजामुळे तरुणाचा गळा चिरला
प्रांजल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक | 06 Jan 2017 05:58 PM (IST)
नाशिक : नायलॉनचा मांजामुळे नाशिकच्या सिडको भागात एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. काल संध्याकाळी मोटरसायकलवरुन जात असताना पंतंगाच्या मांजात अडकून या तरुणाचा गळा चिरला आहे. त्याच्या गळ्याला तब्बल 40 टाके घालण्यात आले आहेत. नाशिकच्या बिर्ला सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये अकाऊंट्समध्ये काम करणाऱ्या दीपक ठाकूरला मांजामुळे गंभीर दुखापत झाली आहे. काल दुपारी कामावर जात असताना वडाळा गावात उडणाऱ्या पतंगाचा मांजा त्याच्या गळ्यात अडकला. त्यामुळे त्याचा गळा जवळपास 7 सेंमी चिरला आहे. मांजा काढण्याच्या प्रयत्नात त्याच्या चार बोटांना आणि गालावर जळखम होऊन रक्तस्त्राव सुरु झाला. या गंभीर दुखापतीनंतर त्याला अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आलं. त्याच्या गळ्यावर तब्बल 40 टाके घालण्यात आलेत. महत्त्वाची बाब म्हणजे आठवड्याभरातील ही मांजानं अपघात होण्याची चौथी घटना आहे. संक्रांतीसाठी देशभरात पतंग उडवले जातात. पंतंगासाठी वापरात येणाऱ्या नायलॉनच्या मांजामुळे दरवर्षी मोठ्या प्रमाणावर नागरिक तसंच पक्षीही जखमी होतात. नायलॉनच्या मांजावर बंदी असूनही त्याचा सर्रासपणे वापर केला जातो. त्यामुळे नायलॉन मांजा वापरणाऱ्यांवर कारवाईची मागणी नागरिकांनी केली आहे.