शटर उचकटून चोरटा दुकानात घुसला, पण बाहेर येता न आल्याने अलगद सापडला
एबीपी माझा वेब टीम | 15 Sep 2017 03:28 PM (IST)
साथीदारानं खूप प्रयत्न करुनही शटर हवं तसं पहिल्याप्रमाणं उचकलं जात नव्हतं. सकाळ होऊन गेल्यानं अखेर साथीदार चोराला तिथेच सोडून दुसरा चोर निघून गेला.
नाशिक: नाशिकमध्ये गुरुवारी गंमतीशीर किस्सा घडला. दोन चोर चोरीसाठी एका दुकानात आले होते. मात्र आत शिरलेल्या एका चोराला बाहेरच येता न आल्याने तो आतच अडकून पडला आणि आपोआप सापडला. नाशिकमधल्या इंदिरानगरमध्ये गुरुवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. काय आहे प्रकरण? बापू बंगला परिसरातल्या विद्यालक्ष्मी स्टेशनरी दुकानात पहाटे चोरी करण्याच्या उद्देशाने दोन चोरटे आले. त्यापैकी एकाने आपल्या साथीदाराच्या मदतीनं लोखंडी गजाने दुकानाचे शटर उचकटून, दुकानात प्रवेश केला. पण नंतर ते शटर बाहेर असलेल्या चोरट्याला उचकटून आत प्रवेश करता येईना. त्यामुळं आत गेलेला चोर दुकानातच अडकून पडला, आणि बाहेरचा बाहेरच राहिला. साथीदारानं खूप प्रयत्न करुनही शटर हवं तसं पहिल्याप्रमाणं उचकलं जात नव्हतं. सकाळ होऊन गेल्यानं अखेर साथीदार चोराला तिथेच सोडून दुसरा चोर निघून गेला. सकाळी परिसरातल्या व्यावसायिकांना दुकानाच शटर वाकवलं गेल्याचं लक्षात आलं. आत कुणीतरी आहे याची जाणीव झाल्यावर पोलिसांना पाचारण करण्यात आलं. पोलिसांनी ताब्यात घेतल्यावर चोरानं आपबिती सांगितली. तेव्हा अनेकांना हसू आवरलं नाही. चोर ट्रॅप झाल्याची ही चर्चा नाशिकमध्ये वाऱ्यासारखी पसरली. पोलीसांनी या चोराला अटक केली असून त्याच्या साथीदाराचाही शोध सुरु केला आहे.