नाशिक : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या आणखी एका महत्त्वाकांक्षी ड्रीम प्रोजेक्ट्ला महाविकास आघाडीकडून ब्रेक मिळण्याची शक्यता आहे. नाशिकमधील देवेंद्र फडणवीस यांच्या सुमारे वीस हजार कोटी रुपयांच्या टायर बेस मेट्रो प्रकल्पाला ब्रेक मिळण्याचे संकेत नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आज दिले आहेत.
विशेष म्हणजे नाशिक महापालिकेतील वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या ठेक्यांबाबत माझ्याकडे तक्रार आल्यास त्याची तात्काळ चौकशी केली जाणार असल्याचंही छगन भुजबळांनी एबीपी माझाशी बोलताना स्पष्ट केलं. नाशिक महापालिकेवर सध्या भाजपची सत्ता असून आज संध्याकाळी महापौर सतीश कुलकर्णी आणि भाजपच्या काही नगरसेवकांनी भुजबळ फार्मवर जाऊन छगन भुजबळ यांची भेट घेतली. त्यांची बंद दाराआड जवळपास 15 मिनिट चर्चा झाली.
चर्चेनंतर गोंधळलेल्या अवस्थेत बाहेर पडलेल्या महापौरांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना सावध प्रतिक्रिया देत काढता पाय घेतला. महापालिकेवर आधीच कराचा बोजा आहे, तिजोरीत खडखडाट आहे आणि असं असताना असे प्रोजेक्ट्स आपण का घेतो? असा सवाल छगन भुजबळ यांनी उपस्थित केला.
मेट्रोबाबत नीट माहिती घ्या, चार तज्ञांना सोबत घेऊन अभ्यास करा आणि विचाराअंती निर्णय घ्या, असं महापौरांना छगन भुजबळांकडून सांगण्यात आलं आहे. याशिवाय नाशिक महापालिकेचा पेस्ट कंट्रोल, घंटागाडी आणि सफाईचा ठेका वादाच्या भोवऱ्यात आहे. या ठेक्यांबाबत माझ्याकडे तक्रार आल्यास त्याची तात्काळ चौकशी केली जाईल, असंही छगन भुजबळांनी सांगितलं.
कसा आहे नाशिकचा टायर मेट्रो प्रकल्प?
सातपूरमधील श्रमिकनगर ते खडकाळी सिग्नल, सारडा सर्कल, व्दारका चौक ते नाशिकरोड असा एक मार्ग राहणार आहे. सातपूर रोडवरील अमृत गार्डन चौकात या मार्गावरील मुख्य जंक्शन असणार आहे. तर दुसरा मार्ग मुंबईनाका, सीबीएस, अशोकस्तंभ ते गंगापूर गाव असा असेल. मुंबईनाक्यावर दुसरे जंक्शन असणार आहे. या दोन्ही मार्गांना जोडणारा लूप बारदान फाटा ते श्रमिकनगर या दरम्यान असणार आहे. दोन्ही मार्गांवर एकूण 29 थांबे असणार आहेत.