प्रेयसीने प्रियकराच्या पत्नीच्या अंगावर कोब्रा सोडला!
प्रांजल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक | 30 Mar 2018 02:26 PM (IST)
विशेष म्हणजे ही घटना 7 सप्टेंबर 2016 रोजी घडली होती.
नाशिक : प्रियकराने दुसऱ्या मुलीशी लग्न केल्याच्या रागातून, प्रेयसीने प्रियकराच्या बायकोला एका खोलीत घेऊन जात तिच्यावर सर्पमित्राच्या सहाय्याने कोब्रा जातीचा नाग सोडला. तसंच कोब्राने दोन वेळा डाव्या हातावर दंश करत तिला जीवे मारण्याचा प्रयत्नही केला. नाशिकमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनंतर संबंधित महिलेने आरडाओरड सुरु करताच हे दोघेही फरार झाले होते. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या महिलेवर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते. विशेष म्हणजे ही घटना 7 सप्टेंबर 2016 रोजी घडली होती. मात्र उपचार सुरु असल्याने तसंच मनात प्रचंड भीती असल्याने महिलेने गुरुवारी रात्री मुंबई नाका पोलिस ठाण्यात या प्रकरणी सविस्तर तक्रार दिली. या प्रकरणात पोलिसांनी पल्लवी भालेराव आणि किरण गांगुर्डे या दोघांविरोधात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. सध्या हे दोघेही फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.