नाशिक : एक कोटी रुपयांचा पैशाचा पाऊस पाडण्याचं आमिष दाखवल्याप्रकरणी नाशकात जादूटोणा कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी पाच जणांना बेड्या ठोकल्या असून एक मांत्रिक फरार आहे.

मुंबईतील एका महिलेने घर घेण्यासाठी ओळखीच्या व्यक्तींकडून दहा  लाख रुपये घेतले होते. मात्र ते परत फेडण्यासाठी पैसे नसल्यामुळे तिने नाशिकमध्ये राहणाऱ्या प्रमोद सूर्यवंशी याच्याशी संपर्क साधला.

माझ्या ओळखीत काही मांत्रिक असून त्यांना 60 हजार रुपये दिल्यास ते एक कोटी रुपयांचा पैशांचा पाऊस पाडतात, असं प्रमोदने संबंधित महिलेला सांगितलं. त्यासाठी एका तरुणीला पूजेसाठी बसवावं लागेल, अशी अटही त्याने महिलेला घातली.

सूर्यवंशीच्या सांगण्यानुसार महिला नाशिकच्या नांदुरनाका परिसरात आपल्या पुतणीला घेऊन आली. सूर्यवंशीने दोन मांत्रिकांसह पाच जणांसोबत तिची ओळख करुन दिली.

महिलेच्या पुतणीला रात्री बारा वाजता पूजेला बसवत सर्व साहित्य मांडण्यात आलं. मंत्रोच्चाराला सुरुवातही केली, मात्र पोलिसांना हा प्रकार समजताच पोलिसांनी तिथे छापा टाकला आणि पाच जणांना ताब्यात घेतलं.

आडगाव पोलिस ठाण्यात जादूटोणा कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला असून पाच जणांना अटक करण्यात आली आहे, तर एक  मांत्रिक फरार आहे.