नाशिक : नाशिकमध्ये सापडलेल्या 1 कोटी 35 लाखांच्या बनावट नोटांप्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. नाशिकसह मुंबई-पुण्यातील सर्व 11 आरोपींच्या घरांची झडती घेण्यात आली.


राष्ट्रवादीशी संबंधित असलेल्या छबू नागरे याच्या खुटवडनगरमधील एका फ्लॅटमध्ये नोटा छपाईचं सामान आढळलं. फ्लॅटमधून पेपर कटिंगचे कटर, 2 प्रिंटर,1 स्कॅनर, आणि वेगवेगळ्या रंगाच्या शाई सापडल्या.

छबू नागरेच्या फ्लॅटमध्येच बनावट नोटांची छपाई होत असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. याप्रकरणात आणखी काही जणांचा सहभाग असण्याची शक्यता आहे. त्या दिशेने पोलिस पुढील तपास करत आहेत.

प्रकरण काय आहे?  

नाशिक पोलिसांनी गुरुवारी मध्यरात्री कारवाई करुन 1 कोटी 35 लाखांच्या जुन्या बनावट नोटा जप्त केल्या. तर 1 लाख 80 हजाराच्या जुन्या खऱ्या नोटा, सुमारे दीड लाखांच्या दोन हजारांच्या नव्या नोटा, अशा एकूण 1 कोटी 39 लाखांच्या नोटा हस्तगत केल्या. बनावट नोटा छापत असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर नोटा बदलून देण्याच्या नावाखाली लूट करत असल्याचा संशय पोलिसांना आला. त्यानुसार कारवाई करत 11 जणांना बेड्या ठोकल्या आहेत. तसंच त्यांच्याकडून 3 आलिशान कारही जप्त केल्या. राष्ट्रवादीचा युवक अध्यक्ष छबु नागरे, रामराव पाटील यांच्यासह 11 जणांना पोलिसांनी अटक केली.

संबंधित बातमी : 1.35 कोटींच्या बनावट नोटा, राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यासह 11 अटकेत