मुंबई : स्वच्छतेबाबत लोकांच्या मानसिकतेत केलेला बदल, सौंदर्यीकरणावर दिलेला भर, स्थानिक प्रशासनांसह आरोग्य कर्मचार्‍यांनी झोकून केलेल्या कार्याची पावती म्हणून स्वच्छता सर्वेक्षणात देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डाने देशभरातील 62 कॅन्टोन्मेंट बोर्डामधून प्रथम स्थान पटकावले आहे.


केंद्र सरकारने स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार 2022 ची घोषणा केली असून मागील वर्षी चौथ्या क्रमांकावर राहिलेल्या नाशिक शहरातील देवळाली कॅन्टोमेंट बोर्डाने यंदा पहिला क्रमांक पटकावला आहे. स्वच्छ देवळाली-सुंदर देवळाली, हरित देवळाली असे ब्रीद असणार्‍या देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डात गेल्या दोन वर्षात सर्वेक्षणात खालच्या स्थानावर घसरण झाली होती. ही उणीव भरून काढण्यासाठी मागील वर्षांपासून मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राहुल गजभिये आणि अधिकारी अजय कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्न सुरू झाले. त्याचप्रमाणे इतर विभागातील अधिकाऱ्यांनी कामकाजाचे केलेले योग्य नियोजन, वेळोवेळी राबविलेल्या स्वच्छता मोहीमा, लोकांना वेळोवेळी पटवून दिलेले स्वच्छतेचे महत्व, आठही वार्डांमध्ये घंटागाड्यांचे अचूक नियोजन प्रभावी ठरले.


देवळाली शहरातील ड्रेनेजच्या पाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी कार्यान्वित करण्यात आलेला सीएसटीपी प्लांट, शहरातील सौंदर्यीकरणसाठी केली जाणारी कलात्मकता, टाकाऊ वस्तूंचा योग्य वापर व कचर्‍याचे योग्य नियोजन या बाबीदेखील महत्त्वपूर्ण ठरल्या. शिवाय मागील वर्षभरापासून प्रत्येक घरातील कचरा घंटागाडीतच गेला पाहिजे यासाठी राबविलेली विशेष मोहीमेमुळे देवळाली कॅन्टोन्मेंटचे नाव थेट पहिल्या क्रमांकांवर आले आहे. 


मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गजभिये म्हणाले की, "आम्ही मागील वर्षी चौथ्या क्रमांकावर पोहचलो होतो, मात्र पहिल्या क्रमांकावर येण्यासाठी आमची धडपड सुरू होती. अखेर अधिकार्‍यांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार आम्ही केलेले नियोजन या यशासाठी खूप महत्त्वपूर्ण ठरले. विशेष म्हणजे प्रत्यक्ष सफाई करणारे आणि घंटागाडी कर्मचारी यांनी प्रामाणिक सेवा दिली. शिवाय देवळाली कॅन्टोमेंट बोर्ड परिसरातील नागरिकांनी सूचनांचे पालन करून मोहिमेत महत्त्वाचा वाटा उचलला. त्यामुळे पहिला क्रमांक मिळाला. मात्र यापुढे हा पहिला क्रमांक अबाधित ठेवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत."


नाशिक मनपाची घसरण 


एकीकडे नाशिक शहरातील देवळाली कॉन्टेनमेंट बोर्ड स्वच्छ सर्वेक्षणात देशात पहिला आला असताना मात्र नाशिक मनपाची चांगलीच घसरण झाली आहे. नाशिक शहराची स्वछ शहर सर्वेक्षणात सलग दुसर्‍या वर्षी घसरण झाली असून नाशिक थेट विसाव्या क्रमांकावर फेकले गेले आहे. भारतात वीस तर राज्यात पाचव्या क्रमांकावर ही घसरण झाली आहे. नाशिकच्या स्वच्छतेसाठी कोट्यवधींचा खर्च करूनही सातत्याने नाशिकची घसरगुंडी होत असल्याने याप्रकरणी आता तर्कवितर्क लावले जात आहेत. स्वच्छततेसाठी येणार्‍या कोट्यवधी रुपयांचे झाले काय असा सवाल उपस्थित केला जात आहे. मागील वर्षी देशात सतराव्या स्थानी गेल्यानंतर महापालिका जोराने कामाला लागली होती. तसेच टॉप टेनमध्ये क्रमांक पटकावण्याचा निर्धार घनकचरा विभागाने केला होता. परंतु हा केवळ पोकळ दावा ठरल्याचे आकडेवारीनुसार दिसून आले आहे.